नवी दिल्ली : क्रिकेटपटू आणि खासदार सचिन तेंडुलकर त्याच्या राज्यसभेतल्या कमी उपस्थितीमुळे नेहमीच वादात राहिला. पण राज्यसभा खासदार म्हणून सचिननं केलेलं काम नक्कीच कौतुकास्पद आहे. खासदार म्हणून मिळालेलं सगळं वेतन आणि भत्ते सचिननं पंतप्रधान मदत निधीला दिले आहेत. सचिनचा राज्यसभेचा कार्यकाळ मागच्या आठवड्यामध्ये संपला.
मागच्या ६ वर्षांमध्ये सचिन तेंडुलकरला जवळपास ९० लाख रुपये वेतन आणि इतर मासिक भत्ते मिळाले. सचिननं दिलेल्या या निधीनंतर पंतप्रधान कार्यालयानं सचिनचे आभार मानले आहेत. सचिनचे हे योगदान संकटात असणाऱ्यांना मदत करण्यासाठी खूप उपयोगी पडेल, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान कार्यालयानं दिली आहे.
सचिन तेंडुलकरला खासदार निधी म्हणून मिळालेल्या एकूण ३० कोटी रुपयांपैकी ७.४ कोटी रुपये शिक्षण आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी खर्च करण्यात आले. खासदार आदर्श ग्राम योजनेच्या कार्यक्रमातून सचिननं दोन गावांनाही दत्तक घेतलं. यामध्ये आंध्र प्रदेशमधलं पुत्तम राजू केंद्रिगा आणि महाराष्ट्रातल्या डोंजा गावाचा समावेश आहे.
याआधी सचिन तेंडुलकरनं काश्मीरमधल्या एका शाळेची इमारत बांधण्यासाठी ४० लाख रुपयांची मदत केली होती. जम्मू काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यामध्ये ही शाळा आहे. इम्पिरियल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट दुर्गमुल्ला ही शाळा २००७ साली बांधण्यात आली. या शाळेत पहिली ते दहावीपर्यंत जवळपास १ हजार विद्यार्थी आहेत. सचिनच्या खासदार निधीतून या शाळेत चार प्रयोगशाळा, १० वर्ग, प्रशासकीय ब्लॉक, सहा प्रसाधन गृह आणि एक प्रार्थना हॉल बांधण्यात येणार आहे.