मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिकेतल्या टेस्ट सीरिजला बुधवारपासून सुरुवात होणार आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधली भारताची ही घरच्या मैदानातली पहिलीच सीरिज आहे. टेस्ट चॅम्पियनशीप या सीरिजला आणखी रोमांचक बनवेल, असं मत सचिन तेंडुलकरने व्यक्त केलं आहे.
जसप्रीत बुमराहची अनुपस्थिती भारताला जाणवेल, असं सचिन म्हणाला आहे. पण भारताचे फास्ट बॉलर आणि स्पिनरमध्ये बुमराहची भरपाई करण्याची क्षमता असल्याचा विश्वास सचिनने व्यक्त केला.
टेस्ट चॅम्पियनशीपमुळे टीमचा उत्साह वाढेल कारण प्रत्येक टीम जास्त पॉईंट मिळवण्याचा प्रयत्न करेल. यामुळे प्रेक्षकांमध्येही उत्साह येईल. टेस्ट चॅम्पियनशीपचे शेवटचे ६ महिने आणखी रोमांचक असतील, अशी प्रतिक्रिया सचिनने दिली आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या टीममध्ये मागच्या काही काळात टेस्ट खेळलेले कमी बॅट्समन असले तरी त्यांची बॅटिंग चांगली आहे. भारतीय बॉलरना एसजी बॉल कसा वापरायचा हे माहिती आहे. सुरुवातीच्या ओव्हरनंतर या बॉलने खेळणं कठीण होतं. या वातावरणाचा भारतीय बॉलर कसा वापर करतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे, असं सचिन म्हणाला.