Sachin Tendulkar On Ravi Ashwin: भारतीय संघाने पुन्हा एकदा आयसीसी ट्रॉफीमध्ये (ICC Trophy) लाजीरवाणी कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाने चौथ्या डावात भारतासमोर विजयासाठी 444 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र, रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्यासारखे दिग्गज खेळाडू असताना देखील टीमला आव्हान पेलता आलं नाही. स्टाईक गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) नसताना देखील टीम इंडियाने गोलंदाजीमध्ये मोठे फेरबदल केले होते. आर आश्विनला (Ravichandran Ashwin) बाहेर बसवण्याचा निर्णय संघाने घेतला होता. त्यावरून आता मास्टर ब्लास्ट सचिन तेंडूलकरने (Sachin Tendulkar) कॅप्टन रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविड या दोघांवर टीकेची झोड उठवली आहे.
जागतिक कसोटी क्रमवारीत नंबर वन असलेल्या आर अश्विनला न खेळवण्यामागचं कारण मला समजलं नाही. मी सामन्यापूर्वी सांगितल्याप्रमाणे, कुशल फिरकीपटू नेहमी वळणाऱ्या ट्रॅकवर अवलंबून नसतात, ते हवेतही चेंडू वळवतात आणि कोणत्याही खेळपट्टीवर कमाल करून दाखवतात. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या 8 फलंदाजांपैकी 5 डावखुरे होते, हे विसरून चालणार नाही, असं म्हणत सचिन तेंडूलकरने टीम इंडियावर सडकून टीका केली आहे.
ऑस्ट्रेलियाने खेळ त्यांच्या बाजूने झुकवण्यासाठी पहिल्या दिवशीच एक भक्कम पाया तयार केला. खेळात टिकून राहण्यासाठी भारताला पहिल्या डावात मोठी फलंदाजी करावी लागली, पण ते शक्य झाले नाही. टीम इंडियासाठी काही चांगले क्षण होते, असंही सचिनने ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यावेळी सचिनने स्टीवन स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड यांचं कौतूक देखील केलंय.
Congratulations to Team Australia on winning the #WTCFinal. @stevesmith49 and @travishead34 set a solid foundation on Day one itself to tilt the game in their favour. India had to bat big in the first innings to stay in the game, but they couldn’t. There were some good moments…
— Sachin Tendulkar (@sachin_rt) June 11, 2023
दरम्यान, पहिल्याच दिवसापासून फलंदाजीसाठी अनुकूल होती. मात्र, रोहित आणि टीम मॅनेजमेंटकडून खेळपट्टीचं योग्य निरीक्षण करण्यात चूक झाल्याचं बोललं जातंय. पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडियाची टॉप ऑर्डर पूर्णपणे फ्लॉप झाल्याचं दिसून आलं तर, अजिंक्य रहाणेला सोडलं तर इतर कोणत्याही फलंदाजाने कमाल केली नाही. याचा परिणाम म्हणून ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसापासून सामन्यावर पकड मजबूत ठेवली होती. त्याचा परिणाम सामन्याच्या अंतिम निर्णयावर दिसून आला आहे.
सामन्यात एकीकडे दिवसेंदिवस टीम इंडियाची पकड लूज होत होती. मात्र, टीम इंडियाच्या खेळाडूंचा वेगळाच खेळ सुरू असल्याचं दिसत होतं. विराट कोहलीसह (Virat Kohli) टीम इंडियाच्या काही खेळाडूंनी सोशल मीडियावर महानता दाखवण्याचा प्रयत्न केला. खेळाडू स्टेटसला इन्पिरेशनल कोट्स टाकत असल्याचं दिसले. मात्र मैदानात कामगिरी झिरो. पराभवानंतर देखील विराट कोहलीने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर प्रसिद्ध चीनी तत्वज्ञानी लाओ-त्सू यांचा कोट शेअर केलाय. Silence is the source of Great Strength म्हणजेच मौन हा महान शक्तीचा स्रोत आहे, असं विराटने इन्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलंय.