रोहितचं २१वं शतक, एवढ्या दिग्गजांचं रेकॉर्ड तुटलं

वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये रोहित शर्मानं शानदार दीडशतकी खेळी केली.

Updated: Oct 29, 2018, 07:02 PM IST
रोहितचं २१वं शतक, एवढ्या दिग्गजांचं रेकॉर्ड तुटलं title=

मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये रोहित शर्मानं शानदार दीडशतकी खेळी केली. रोहितनं १३७ बॉलमध्ये १६२ रनची खेळी केली. यामध्ये २० फोर आणि ४ सिक्सचा समावेश होता. रोहित शर्माची वनडे क्रिकेटमधली ही ७वी दीडशतकी खेळी होती. याचबरोबर रोहितनं वनडेमध्ये पाकिस्तानच्या सईद अन्वरला पिछाडीवर टाकलं आहे. रोहितनं त्याच्या १९२व्या मॅचमध्ये २१वं शतक केलं. सईद अन्वरनं २४७ मॅचमध्ये २० शतकं केली होती. सर्वाधिक शतकांचा रेकॉर्ड सचिनच्या नावावर आहे. सचिननं ४९ वनडे शतकं केली आहेत. तर या यादीत विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोहलीनं आत्तापर्यंत ३८ शतकं केली आहेत.

शतकांच्या यादीत रोहित ११वा

वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित अकराव्या क्रमांकावर आहे. या यादीत सचिन तेंडुलकर(४९), विराट कोहली(३८), रिकी पाँटिंग(३०), सनथ जयसूर्या(२८), हाशीम आमला(२६), एबी डिव्हिलियर्स(२५), कुमार संगकारा(२५), क्रिस गेल(२३), सौरव गांगुली(२२), तिलकरत्ने दिलशान(२२), हर्षल गिब्ज(२१) हे खेळाडू आहेत.

मियांदाद, टेलर, युनूस खानचं रेकॉर्ड तुटलं

रोहितनं वनडेतल्या रनचं मियांदाद, युनूस खान आणि रॉस टेलरचं रेकॉर्ड मोडलं आहे. रोहितनं या मॅचआधी १९१ मॅचमध्ये ७,२२९ रन केले होते. या मॅचमध्ये १६२ रन केल्यामुळे रोहितच्या नावावर आता १९२ वनडेमध्ये ७,३९१ रन आहेत. त्यामुळे रोहितनं जावेद मियांदाद(७,३८१ रन), रॉस टेलर(७,२६७ रन) आणि युनूस खान(७,२४९ रन) यांना मागे टाकलंय.

रोहितनं सचिनलाही मागे टाकलं

या मॅचमध्ये रोहितनं सचिनचं सिक्सचं रेकॉर्डही मोडलं. रोहित शर्मानं १९२ वनडेमध्ये १९८ सिक्स मारले आहेत. सचिननं ४६४ मॅचमध्ये १९५ सिक्स मारले होते. सर्वाधिक सिक्स मारणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत रोहित दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताकडून महेंद्रसिंग धोनीनं सर्वाधिक सिक्स मारले आहेत. तर जगभरात शाहिद आफ्रिदी(३५१ सिक्स), क्रिस गेल(२७५ सिक्स), सनथ जयसूर्या(२७० सिक्स), महेंद्रसिंग धोनी(२१८ सिक्स), एबी डिव्हिलियर्स(२०४ सिक्स) आणि ब्रॅण्डन मॅक्कलम(२०० सिक्स) यांनी सर्वाधिक सिक्स मारले आहेत.

ब्रेबॉर्न स्टेडियमवर पहिलं शतक

मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर कोणत्याही भारतीय खेळाडूचं हे पहिलं वनडे शतक आहे. याआधी ब्रेबॉर्न स्टेडियमवर विनोद कांबळीनं सर्वाधिक ४८ रनची खेळी केली होती. या मैदानात याआधी भारतानं फक्त एकच वनडे मॅच खेळली होती. १९९५ साली या मैदानात भारतानं न्यूझीलंडला ६ विकेटनं हरवलं होतं. या मैदानातली ही ७वी वनडे आहे. वेस्ट इंडिज या मैदानात ५ वेळा खेळली आहे. यातल्या ४ मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला तर एका मॅचमध्ये विजय मिळाला.