Team India: वर्ल्डकपची वरात; टीम इंडियाच्या घरात... ढोलताशांचा आवाज ऐकताच रोहित, सूर्यानं 'असा' धरला ठेका

दिल्ली एअरपोर्टवरून टीम इंडिया हॉटेलमध्ये गेली. यावेळी हॉटेलमध्ये प्रवेश करत असताना ढोलाच्या तालावर रोहित शर्माने ठेका धरला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. 

सुरभि जगदीश | Updated: Jul 4, 2024, 09:43 AM IST
Team India: वर्ल्डकपची वरात; टीम इंडियाच्या घरात... ढोलताशांचा आवाज ऐकताच रोहित, सूर्यानं 'असा' धरला ठेका title=

Team India: टीम इंडिया टी-20 वर्ल्डकपची ट्रॉफी घेऊन अखेर भारतात परतली आहे. सकाळी 7 वाजताच्या सुमारास टीम इंडिया दिल्लीच्या एअरपोर्टवर दाखल झाली होती. यावेळी चाहत्यांनी टीम इंडिया येणार यासाठी एअरपोर्टवर गर्दी केली होती. रोहित शर्मा हातात ट्रॉफी घेऊन आल्यावर चाहत्यांनी एकच जल्लोष केला. यानंतर दिल्ली एअरपोर्टवरून टीम इंडिया हॉटेलमध्ये गेली. यावेळी हॉटेलमध्ये प्रवेश करत असताना ढोलाच्या तालावर रोहित शर्माने ठेका धरला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. 

रोहित शर्माचा डान्स होतोय व्हायरल

टीम इंडिया दिल्लीतील आयटीसी मौर्य हॉटेलमध्ये थांबले आहेत. टीम इंडियाचे खेळाडू एअरपोर्टवरून थेट हॉटेलमध्ये पोहोचले. यावेळी हॉटेलच्या प्रवेशद्वाराजवळच ढोलाच्या गजरात टीम इंडियाच्या खेळाडूंचं स्वागत करण्यात आलं. पंजाबी ढोल ऐकताच रोहित शर्मा स्वतःला थांबवू शकला नाही आणि त्याने ठेका धरला. ढोलाच्या तालावर रोहित शर्माने अगदी मनसोक्त डान्स केला आहे. रोहितचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Cricket Dhamaka  (@cricket_dhamaka_marathi)

पंत-सूर्यानेही केला भांगडा

रोहितनंतर सूर्याही मागे राहिला नाही. त्यानेही या तालावर भांगडा करण्यास सुरुवात केली. तर दुसरीकडे या व्हिडीओमध्ये ऋषभ पंतच्या हातात ट्रॉफी आहे आणि त्याने देखील हॉटेलमध्ये जाण्यापूर्वी ठेका धरला. 

कसं असणार आहे टीमचं आजचं शेड्यूल?

बीसीसीआयने टीम इंडियासाठी रवाना केलेल्या एअर इंडियाच्या विशेष विमानाने संघ सकाळी दिल्लीत पोहोचला आहे. यानंतर सकाळी 11 वाजता टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत. दुसरीकडे पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर टीम इंडिया ट्रॉफीसह मुंबईला रवाना होणार आहे. मुंबईमध्ये संध्याकाळी 5 वाजता मरिन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम अशी भव्य रॅली निघणार आहे. 

रोहित शर्माचं चाहत्यांना खास निमंत्रण

गुरूवारी भारतीय संघ विजयी परेड मुंबईत करणार आहे.  यासाठी रोहित शर्माने संपूर्ण देशातील चाहत्यांना विजयी जल्लोषासाठी मरीन ड्राईव्हमध्ये येण्याचं निमंत्रण दिलंय. रोहित शर्माने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटलंय की, “आम्हा सर्वांना तुमच्याबरोबर या खास क्षणाचा आनंद साजरा करायचा आहे. चला तर मग 4 जुलैला संध्याकाळी 5 वाजल्यापासून मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम या विजयी परेडसह हा आनंद साजरा करूया.”