मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेत टीम इंडियाने 2-1 च्या फरकाने विजय मिळवला. अखेरच्या सामन्यात भारतीय टीमला 49 रन्सने पराभवाचा सामना करावा लागला. यावेळी सिरीज जिंकली असली तरीही आगामी वर्ल्डकपच्या दृष्टीकोनातून टीम इंडियाच्या चिंता काही केल्या दूर होताना नाहीयेत. डेथ ओव्हर्समधली निराशाजनक कामगिरी आणि त्यातच जसप्रीत बुमराहचं दुखापतीमुळे टीमबाहेर जाणं टीम इंडियाला चांगलंच महागात पडताना दिसत आहे.
येत्या वर्ल्डकपमध्ये बुमराह दुखापतीमुळे खेळू शकणार नसल्याचं आता स्पष्ट झालंय. यानंतर कर्णधार रोहित शर्माला याबाबत विचारलं असता, बुमराहची जागा टीममध्ये कोण घेणार हे आता सांगू शकणार नाही. ऑस्ट्रेलियात पोहोचल्यावर याचा निर्णय घेऊ, असं त्याने सांगितलं आहे.
रोहित म्हणाला, “जसप्रीत बुमराह वर्ल्डकप खेळणार नाहीये, आमच्यासाठी हा मोठा फटका आहे. आम्हाला त्याला पर्याय शोधावा लागणार आहे, तो कोण असेल हे मला आताच सांगता येणार नाही. काही लोकं यासाठी शर्यतीत आहेत. परंतु आम्ही ऑस्ट्रेलियात पोहोचल्यानंतर याबद्दल निर्णय घेऊ”
यावेळी रोहित शर्माने टीम इंडियाच्या बॉलिंगबद्दल चिंता व्यक्त केली. आम्हाला आमच्या गोलंदाजीकडे लक्ष देण्याची गरज आहे. पॉवरप्ले, मिडल ओव्हर्स आणि डेथ ओव्हर्समध्ये आणखी काय पर्याय तयार होऊ शकतात हे आम्हाला पहावं लागणार आहे. आम्ही अजुनही त्यावर काम करत आहोत. खेळाडूंना त्यांच्या भूमिकेबद्दल स्पष्टता हवी आहे आणि ती स्पष्टता त्यांना मिळवून देणं हे माझं काम आहे. ही प्रक्रिया अद्याप सुरु असल्याचं, रोहित शर्माने सांगितलं.
जसप्रीत बुमराहच्या जागी एक घातक गोलंदाज जागा घेऊ शकतो. कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी यासंदर्भात संकेत दिले आहेत. टीम इंडियाचा अनुभवी आणि भेदक गोलंदाज मोहम्मद शमीचा (Mohammed Shami) टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात समावेश होऊ शकतो. मोहम्मद शमी आता पूर्णपणे फिट होत असून जसप्रीत बुमराहची जागा घेण्यासाठी तो सज्ज आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, आर पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, बी. कुमार, हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंग.
स्टँडबाय खेळाडू - मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर