रांची : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या T-20 सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला. रोहितने मोहम्मद सिराजच्या जागी हर्षल पटेलला संधी दिली. परंतु रोहित शर्माने टीम इंडियाच्या अशा महान खेळाडूला बाहेर ठेवलं ज्याने भारतासाठी अनेकदा सामने जिंकले आहेत. मात्र या मॅचविनर खेळाडूला रोहितने सलग दुसऱ्या सामन्यात बाहेर ठेवलं आहे.
भारताचा स्टार लेगस्पिनर युझवेंद्र चहलला सलग दुसऱ्या सामन्यात रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यांच्या जागी अक्षर पटेलला संधी देण्यात आली आहे. तर चहलने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत.
चहलची गणना भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या खास खेळाडूंमध्ये केली जाते. चांगल्या फॉर्म असूनही चहलला संघात स्थान मिळवता आलं नाही.
आयपीएल 2021 मध्ये, भारताचा स्टार लेग-स्पिनर युजवेंद्र चहलने घातक फॉर्म दाखवला. त्याने स्वबळावर एसीबीला प्लेऑफमध्ये नेलं. चहल जेव्हा फॉर्ममध्ये असतो तेव्हा तो कोणत्याही उत्तम फलंदाजाची दाणादाण उडवू शकतो. आयपीएलमध्ये या गोलंदाजाने आरसीबीसाठी घातक गोलंदाजी केली. चहलने आयपीएल 2021च्या 15 सामन्यांमध्ये 18 विकेट घेतल्या.
एका वेबसाईटशी बोलताना युझवेंद्र चहल म्हणाला, "गेल्या चार वर्षात मला टीम इंडियातून वगळलं नाही आणि त्यानंतर इतक्या मोठ्या स्पर्धेसाठी मला अचानक संघातून वगळण्यात आलं. मला खूप वाईट वाटलं. मी दोन तीन दिवस डाऊन होतो. पण, त्यानंतर मला माहित होतं की आयपीएलचा दुसरा टप्पा आता जवळ येणार आहे."
"मी माझ्या कोचकडे गेलो आणि त्यांच्याशी खूप बोललो. माझी पत्नी आणि कुटुंबीयांनी मला सतत प्रोत्साहन दिलं. मी जास्त काळ या गोष्टीचा विचार करू शकलो नाही. कारण त्याचा माझ्या आयपीएल फॉर्मवर परिणाम झाला असता," असंही चहलने सांगितलंय.