INDvsNZ: तिसऱ्या सामन्यात रोहित-कोहली जोडीची विक्रमाला गवसणी

न्यूझीलंडचा हा दौरा विक्रमांचाच ठरत असल्याचं दिसतंय.   

Updated: Jan 28, 2019, 05:52 PM IST
INDvsNZ: तिसऱ्या सामन्यात रोहित-कोहली जोडीची विक्रमाला गवसणी  title=

माउंट मोनगानुई : न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहल-कुलदीप यादव आणि रोहित-कोहलीच्या जोडीने विक्रम केला आहे. त्यामुळे न्यूझीलंडचा हा दौरा विक्रमांचाच ठरत असल्याचं दिसतंय. 

रोहित-'विराट' भागीदारी 

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या मॅचमध्ये भारताचा ७ विकेटने विजय झाला आहे. शिखलर धवन बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला आलेला कॅप्टन कोहली आणि रोहित शर्मामध्ये ११३ रनची भागीदारी झाली. या भागीदारीने भारताच्या विजयाचा पाया रचला. रोहित-विराटच्या जोडीने या भागीदारी सोबत एका विक्रमाची बरोबरी केली आहे.

रोहित-विराट मध्ये झालेली ही १६वी शतकी भागीदारी होती. ही शतकी भागीदारी करुन रोहित-कोहलीच्या जोडीने ऑस्ट्रेलियाच्या माजी सलामीवीर अॅडम गिलख्रिस्ट आणि मॅथ्यू हेडन यांच्यासोबत तिसऱ्या क्रमांकावर स्थानपन्न झाले आहेत. सर्वात जास्त सलामी शतकी भागीदारी करण्याचा विक्रम हा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर आणि सौरव गांगुली यांच्या नावे आहे. या दोघांनी २६ वेळा शतकी कामगिरी केली आहे.

कुलदीप-चहलची जोडी

कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांच्या कुलचा जोडीने आजच्या सामन्यात १०० विकेटचा टप्पा पूर्ण केला आहे. या जोडीने न्यूझीलंड दौऱ्याआधी ८७ विकेट घेतले होते. न्यूझीलंड विरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यात अनुक्रमे चायनामॅन  कुलदीप यादवने ४-४-० असे विकेट घेतले. तर युजवेंद्र चहलने तीन सामन्यात अनुक्रमे २-२-२ विकेट घेतले.

याआधी भारताचे सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्मा या दोघांनी न्यूझीलंड विरुद्धातील दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना १५४ धावांची धमाकेदार भागीदारी केली होती. धवन-रोहितने १५४ धावांच्या भागीदारीमुळे सलामीला १४ पेक्षा अधिक वेळा शतकी भागीदारी करण्याचा विक्रम केला होता. भारताचे माजी सलामीवीर सचिन-सेहवाग यांनी १२ शतकी भागीदारी केल्या होत्या. 

या विजयामुळे भारतीय टीमनं पाच वनडे मॅचच्या सीरिजमधील सलग तिसरा सामना जिंकत सीरिजही जिंकली आहे. या पाच सामन्यांच्या सीरिजमध्ये भारताने ३-० अशी आघाडी घेतली आहे. तसेच हा सीरिज विजय ऐतिहासिक ठरलेला आहे. पुढील सामना जिंकत २०१४ साली न्यूझीलंडने  ४-० ने केलेल्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी भारताला आहे.