IPL 2024 : ऋषभ पंत आयपीएल खेळणार, पण कॅप्टन्सीवर सस्पेन्स कायम; दिल्ली कॅपिटल्स करणार 'या' नियमाचा वापर!

IPL 2024, Rishabh Pant : ऋषभच्या अनुपस्थितीमुळे दिल्ली कॅपिटल्समध्ये (Delhi Capitals) मोठी पोकळी निर्माण झाली होती. आगामी आयपीएलमध्ये ऋषभ पंत खेळू शकतो, अशी माहिती समोर आलीये.

सौरभ तळेकर | Updated: Dec 11, 2023, 08:57 PM IST
IPL 2024 : ऋषभ पंत आयपीएल खेळणार, पण कॅप्टन्सीवर सस्पेन्स कायम; दिल्ली कॅपिटल्स करणार 'या' नियमाचा वापर! title=
IPL 2024, Rishabh Pant, Delhi Capitals

Rishabh Pant Comeback In IPL 2024 : टीम इंडियाचा स्टार विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्या फिटनेसवर सध्या सर्वांचं लक्ष लागलंय. 30 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या भीषण अपघातानंतर तो क्रिकेटच्या मैदानापासून लांब आहे. ऋषभच्या अनुपस्थितीमुळे दिल्ली कॅपिटल्समध्ये (Delhi Capitals) मोठी पोकळी निर्माण झाली होती. अशातच आता तब्बल वर्षभरानंतर ऋषभ पंत क्रिकेटच्या मैदानात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आगामी आयपीएलमध्ये (IPL 2024) ऋषभ पंत खेळू शकतो, अशी माहिती आता समोर आली आहे.

ऋषभ पंत आयपीएलच्या आगामी हंगामात खेळेल, असं दिल्ली कॅपिटल्सचे क्रिकेट संचालक सौरव गांगुली यांनी सांगितलं होतं. अशातच आता RevSportz च्या वृत्तानुसार ऋषभ पंत आगामी आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सकडून खेळण्याची शक्यता आहे. ऋषभ संपूर्ण आयपीएल खेळू शकत नसेल तरी तो इम्पॅक्ट प्लेयर नियमानुसार (Impact player Rule) दिल्लीची साथ देऊ शकतो. यावर अद्याप दिल्ली कॅपिटल्सने अधिकृत माहिती जाहीर केली नाही. दिल्ली कॅपिटल्स व्यवस्थापन ऋषभ पंतवर जास्त दबाव आणू इच्छित नाही, अशी माहिती देखील आता समोर आलीये. त्यामुळे ऋषभ आगामी हंगामात कॅप्टन असेल की नाही? यावर अद्याप संभ्रम कायम आहे.

इम्पॅक्ट प्लेयर नियम आहे तरी काय?

इम्पॅक्ट प्लेयर नियमानुसार, टॉसनंतर प्रत्येक संघाला त्यांच्या प्लेइंग इलेव्हन व्यतिरिक्त पाच बदली खेळाडूंची नावं देण्याची परवानगी आहे. खेळादरम्यान कोणत्याही वेळी, त्यापैकी एक खेळाडू प्लेइंग इलेव्हनच्या खेळाडूची जागा घेऊ शकतो. सामन्यादरम्यान एक खेळाडू बदली केला जाऊ शकतो. त्यामुळे सामन्याचं पारडं बदलण्यास मदत होते. आयपीएल 2023 मध्ये हा नियम आमलात आणण्यात आला होता.

वसीम जाफर म्हणतो...

इम्पॅक्ट प्लेयर नियमामुळे देशांतर्गत क्रिकेटमध्येही भविष्यात भारताला चांगले अष्टपैलू खेळाडू मिळणं कठीण होईल. मला वाटतं की आयपीएलमधून खेळाडूंचा प्रभाव काढून टाकणं आवश्यक आहे कारण ते अष्टपैलू खेळाडूंना अधिक गोलंदाजी करण्यास प्रोत्साहित करत नाही आणि फलंदाज गोलंदाजी न करणं ही भारतीय क्रिकेटसाठी चिंतेची बाब आहे, असं माजी भारतीय क्रिकेटपटू वसीम जाफर याने म्हटलं होतं.