नवी दिल्ली : इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्धच्या सीरिजसाठी टीममध्ये स्थान न मिळाल्यामुळे ऋषभ पंत नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या. या सगळ्या चर्चांना खुद्ध ऋषभ पंतनं पूर्णविराम दिला आहे. भारतीय संघात निवड न झाल्यामुळे मी नाराज असल्याच्या अफवा गेल्या काही दिवसांपासून पसरवल्या जात आहेत. मी असं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. त्यामुळे अशा अफवा पसरवू नका आणि मला खेळावर लक्ष केंद्रीत करू द्या, असं ट्विट ऋषभ पंतनं केलं आहे. ऋषभ पंतनं यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक रन केल्या आहेत. यामुळे सध्या ऑरेंज कॅपही त्याच्याकडेच आहे. पंतनं यंदाच्या आयपीएलमध्ये ५२.९०ची सरासरी आणि १७९.६२च्या स्ट्राईक रेटनं ५८२ रन केल्या आहेत.
हैदराबादविरुद्धच्या मॅचमध्ये ऋषभ पंतनं ६३ बॉलमध्ये १२८ रनची खेळी केली. या खेळीनंतर ऋषभ पंतबाबत एका न्यूज चॅनलच्या फेक अकाऊंटवरून ट्विट करण्यात आलं. अफगाणिस्तान, इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्धच्या सीरिजसाठी निवड न झाल्यामुळे मी नाराज आहे. हा सगळा राग मी हैदराबादविरुद्ध खेळताना काढला, असं ट्विट या हॅण्डलवरून करण्यात आलं. यानंतर हे ट्विट मोठ्याप्रमाणावर व्हायरल झालं. अखेर ऋषभ पंतनं यावर भाष्य केलं.
Just to clarify some rumours going around about my statement about not getting selected to play for india I never said anything like that it so just giving out my clarification .So please stop spreading rumours and let me concentrate on my cricket
— Rishabh Pant (@RishabPant777) May 13, 2018