रिकाम्या हाती मायदेशी परतल्याने मेरी कोमने मागितली देशवासियांची माफी

मायदेशी परतल्यानंतर मेरी कोमने देशवासियांची माफी मागितली आहे. 

Updated: Aug 1, 2021, 09:05 AM IST
रिकाम्या हाती मायदेशी परतल्याने मेरी कोमने मागितली देशवासियांची माफी title=

मुंबई : सहा वेळा विश्वविजेत्या मेरी कोमचं दुसऱ्यांदा ऑलिम्पिक पदक जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. टोकियो ऑलिम्पिकच्या प्रि-क्वार्टर फायनलमध्ये मेरी कोमला रिओ ऑलिम्पिक ब्राँझ मेडल विजेती इंग्रीट व्हॅलेन्सियाने मात दिली. यानंतर शनिवारी मेरी कोम भारतात परतली आहे. दरम्यान मायदेशी परतल्यानंतर मेरी कोमने देशवासियांची माफी मागितली आहे. 

मायदेशी परतल्यावर मेरी कोमला दिल्ली एअरपोर्टवरच पत्रकारांनी गाठलं. यावेळी मेरी कोम म्हणाली, "मेडल न जिंकता मायदेशी येणं मला अतिशय वाईट 
वाटतंय. दोन राऊंड सहजतेने जिंकल्यानंतर माझा कसा काय पराभव होऊ शकतो. रिकाम्या हाती आल्याने मी देशवासियांची माफी मागते." 

इंग्रीट व्हॅलेन्सियाने मेरीचा 2-3 असा पराभव केला. मेरी कोमने या सामन्यात 3 पैकी 2 फेऱ्या जिंकल्या होत्या. मात्र तरीही मेरीचा पराभव झाला. मेरी कोमने प्री-क्वार्टर फायनलमधील 'वाईट निर्णया'साठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या बॉक्सिंग कृती दलाला जबाबदार धरलं.

दरम्यान सामन्यानंतर पीटीआयशी बोलताना मेरी कोम म्हणाली होती, ‘‘सामना संपल्यानंतर मी आनंदाने रिंगण सोडलं. कारण मी जिंकल्याचं मला वाटत होते. मला डोपिंग टेस्टसाठी त्यांनी नेलं, तेव्हासुद्धा मी शांत होते. समाजमाध्यमांवर आणि माझे कोच छोटेलाल यादव यांच्याकडून मी पराभूत झाल्याचं मला समजलं. मी याआधी दोनदा व्हॅलेन्सियाला हरवलं होते. त्यामुळे पंचांनी विजयी म्हणून तिचा हात उंचावला, यावर माझा विश्वासच बसेना,’’ 

मेरी पुढे म्हणाली ‘‘या निर्णयाविरुद्ध आढावा घेता येत नव्हता आणि निषेधही नोंदवता येत नव्हता. परंतु जगाने हे सर्व नक्की पाहिलंय. याची मला खात्री आहे. मी दुसरी फेरी जिंकले, मग अंतिम निकाल माझ्या विरोधात 3-2 कसा काय जाऊ शकतो. जे घडलं, ते पूर्णपणे माझ्यासाठी अनपेक्षित होतं."