मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक निवडण्यासाठी बीसीसीआयनं सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस.लक्ष्मण यांच्या समितीची नियुक्ती केली होती. पण या तिघांनी प्रशिक्षकाची निवड करण्यासाठी मानधन मागितल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. या सगळ्या बातम्या बीसीसीआयनं फेटाळून लावल्या आहेत. बीसीसीआयचे सीईओ राहुल झोरी यांनी प्रसिद्धी पत्रक काढून या वादावर स्पष्टीकरण दिलं आहे.
भारतीय संघाचा सध्याचा प्रशिक्षक अनिल कुंबळेचा बीसीसीआयसोबतचा करार संपतो आहे. त्यामुळे नव्या प्रशिक्षकाच्या निवडीसाठी तेंडुलकर, गांगुली आणि लक्ष्मण यांची समिती प्रशिक्षकपदासाठी अर्ज पाठवलेल्या खेळाडूंची मुलाखत घेणार आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा कोच होण्यासाठी बीसीसीआयकडे सहा जणांनी अर्ज केले आहेत. यामध्ये चार भारतीय तर दोन परदेशी खेळाडू आहेत. प्रशिक्षकपदासाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये सध्याचा भारतीय संघाचा कोच अनिल कुंबळे, भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग, अफगाणिस्तानचे प्रशिक्षक लालचंद राजपूत आणि गगन खोडा यांनी अर्ज केले आहेत.