मुंबई : वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा न्यूझीलंडकडून १८ रननी पराभव झाला. यामुळे वर्ल्ड कप जिंकण्याचं टीम इंडियाचं स्वप्न भंगलं. यानंतर टीम इंडिया रविवारी भारतात दाखल झाली. पण यानंतर आता लगेचच टीम इंडियामध्ये फूट पडली असल्याची चर्चा सुरु झाली आहे. टीममधल्या एका खेळाडूने याबाबत खळबळजनक वक्तव्य केल्याचं वृत्त दैनिक जागरणने प्रसिद्ध केलं आहे.
'टीम इंडियामध्ये दोन गट पडले आहेत. यातल्या एका गटाचे खेळाडू विराट कोहलीच्याजवळ आणि इतर खेळाडू रोहित शर्माच्या जवळ आहेत. रवी शास्त्री आणि विराट कोहलीच्या एकतर्फी निर्णय घेण्यावरही काही खेळाडू नाराज आहेत. अंबाती रायुडूऐवजी विजय शंकरला संधी देण्याचा निर्णयही त्यातलाच होता,' असं या खेळाडूने सांगितलं.
दैनिक जागरणने दिलेल्या वृत्तानुसार, काही खेळाडूंना टीम निवडीमध्ये प्राधान्य दिलं जातं. विराट कोहलीच्या पसंतीच्या खेळाडूंना जास्त संधी मिळते. रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांना कामगिरीमुळे डावलण्यात येऊ शकत नाही. पण जे खेळाडू कोहलीच्या जवळ आहेत, त्यांना प्राधान्य दिलं जातं. ज्या खेळाडूंना डावललं जातं ते रोहितच्या जवळ जातात, असे आरोप या खेळाडूने केले आहेत.
टीममधलं स्थान धोक्यात येईल म्हणून विराट आणि शास्त्रीच्या निर्णयावर कोणताही खेळाडू प्रश्न उपस्थित करत नाही. तसंच सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांचा विराट कोहलीला पाठिंबा आहे, असा दावा खेळाडूने केल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.
मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि बॉलिंग प्रशिक्षक भारत अरूण यांच्या कामगिरीवरही टीम नाराज आहे. या दोघांची हकालपट्टी व्हावी, असंही काही खेळाडूंना वाटत आहे. २०१७ साली विराटसोबत झालेल्या वादानंतर अनिल कुंबळेना प्रशिक्षकपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर रवी शास्त्रींची प्रशिक्षकपदी निवड झाली होती.