श्रेयस अय्यरला 'ती' चूक भोवली, BCCI ने शिस्तभंगाची कारवाई करत काढलं संघाबाहेर?

रिपोर्टनुसार, फलंदाज श्रेयस अय्यरला अफगाणिस्तानविरोधातील टी-20 संघात स्थान देण्यात आलेलं नाही.   

शिवराज यादव | Updated: Jan 10, 2024, 04:12 PM IST
श्रेयस अय्यरला 'ती' चूक भोवली, BCCI ने शिस्तभंगाची कारवाई करत काढलं संघाबाहेर?   title=

अफगाणिस्तानविरोधातील टी-20 मालिकेच्या निमित्ताने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी संघात पुनरागमन केलं आहे. यानिमित्ताने दोघांनी वर्ल्डकप खेळणार असल्याचे संकेत दिले असल्याची चर्चा आहे. पण यावेळी सर्वाधिक लक्ष श्रेयस अय्यरने वेधून घेतलं. एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये श्रेयस अय्यरने चांगल्या धावा केल्या होत्या. तसंच दक्षिण आफ्रिकेविरोधातील एकदिवसीय आणि कसोटी मालिकेतही सहभागी झाला होता. त्यामुळेच अफगाणिस्तानविरोधातील मालिकेतून श्रेयस अय्यरला वगळण्यात आल्याने क्रिकेट चाहत्यांच्या भुवया उंचावल्या. 

एबीपीने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, दक्षिण आफ्रिकेविरोधातील कसोटी मालिकेत श्रेयस अय्यरने ज्या अंदाजात फलंदाजी केली ते निवडकर्त्यांना आवडलेलं नाही. तसंच श्रेयस अय्यरने मुंबईकडून रणजी खेळण्यास प्राधान्य न देता सुट्टी घेण्याचा निर्णय घेणंही संघ व्यवस्थापनाला रुचलेलं नाही. 

अफगाणिस्तानविरोधात संधी न दिलेल्या श्रेयसा मुंबईच्या रणजी संघात सहभागी करुन घेण्यात आलं आहे. 12 ते 15 जानेवारीदरम्यान होणाऱ्या रणजी ट्रॉफीत तो आंध्रविरोधात खेळताना दिसणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरोधात चांगली कामगिरी न करु शकणाऱ्या श्रेयसला यानिमित्ताने पुन्हा उसळी घेण्याची संधी आहे. तसंच 25 जानेवारीला इंग्लंडविरोधात सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी आपलं स्थान निश्चित करण्याचीही संधी आहे. 

सरफराज खानच्या जागी श्रेयस अय्यरला संधी देण्यात आली आहे. सरफराज खान अहमदाबादमध्ये भारत अ संघात सहभागी होणार आहे. तथापि, मुंबईला अष्टपैलू शिवम दुबेशिवाय खेळावं लागणार आहे. कारण त्याला 11 जानेवारीपासून अफगाणिस्तानविरुद्ध सुरू होणाऱ्या आगामी तीन सामन्यांच्या मालिकेसाठी बोलावण्यात आलं आहे.

अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन T20 सामन्यांसाठी भारतीय संघ: 

रोहित शर्मा, शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान आणि मुकेश कुमार.