म्हणून भारतीय टीम काळी पट्टी बांधून मैदानात

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ७ विकेटने विजय झाला.

Updated: Jan 20, 2020, 04:33 PM IST
म्हणून भारतीय टीम काळी पट्टी बांधून मैदानात title=
फोटो सौजन्य : बीसीसीआय

बंगळुरू : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ७ विकेटने विजय झाला. याचबरोबर भारताने ३ वनडे मॅचची सीरिज २-१ने जिंकली. मुंबईतल्या झालेल्या पहिल्या वनडेमध्ये १० विकेटने दारुण पराभव झाल्यानंतर भारतीय टीमने जोरदार पुनरागमन केलं आणि राजकोट तसंच बंगळुरूची मॅच जिंकली. बंगळुरूमध्ये झालेल्या तिसऱ्या वनडेमध्ये भारतीय टीम दंडाला काळ्या पट्ट्या बांधून मैदानात उतरली होती.

भारताचे माजी क्रिकेटपटू बापू नाडकर्णी यांचं निधन झालं. बापू नाडकर्णींना श्रद्धांजली म्हणून भारतीय टीम काळ्या पट्ट्या बांधून खेळत होती. ८६ वर्षांच्या बापू नाडकर्णींनी शुक्रवारी अखेरचा श्वास घेतला. टेस्ट क्रिकेटमध्ये लागोपाठ २१ ओव्हर मेडन टाकण्याचा विक्रम बापू नाडकर्णींच्या नावावर आहे. १९६४ साली मद्रास टेस्टमध्ये इंग्लंडविरुद्ध बापू नाडकर्णी यांनी ही कामगिरी केली. बापू नाडकर्णींचा हा विक्रम अजूनही कायम आहे.

१९६०-६१ साली पाकिस्तानविरुद्ध कानपूर टेस्टमध्ये बापू नाडकर्णींनी ३२ ओव्हरमध्ये २४ ओव्हर मेडन टाकल्या आणी २३ रन दिल्या. यानंतरच्या दिल्ली टेस्टमध्ये नाडकर्णींनी ३४ ओव्हरमध्ये २४ मेडन ओव्हर, २४ रन देऊन १ विकेट घेतली होती.

बापू नाडकर्णींनी भारतासाठी ४१ टेस्ट मॅच खेळल्या. एवढ्या टेस्टमध्ये नाडकर्णींनी ८८ विकेट घेतल्या, तर २५.७० च्या सरासरीने १,४१४ रनही केल्या. टेस्ट कारकिर्दीत बापू नाडकर्णींनी ४ वेळा इनिंगमध्ये ५ विकेट आणि एकदा मॅचमध्ये १० विकेट घेतल्या.