नवी दिल्ली : सध्या आयपीएलच्या लिलावाची सगळीकडेच चर्चा होत आहे. एक चर्चा अधिकच होतीये ती म्हणजे जयदेव उनदकट याला राजस्थान रॉयल्सने ११.५० कोटींना विकत घेतल्याची.
कुणाला अंदाजही नव्हता की, उनदकटसाठी इतकी बोली लागू शकते. पण त्याने भारतीय खेळाडूंसाठी एक नवा रेकॉर्ड केला. अशीच आणखी एक चर्चा तेव्हा झाली, जेव्हा विराट कोहलीची टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ४ गोलंदाजांना खरेदी केले.
तसे तर अनेक टीम्सनी गोलंदाज खरेदी केले. पण आरसीबीने ज्या ४ गोलंदाजांना विकत घेतले त्यांच्यात वेगळेपण आहे. आरसीबीने त्यांना विकत घेतल्यावर सोशल मीडियात एकच चर्चा रंगली. आयपीलच्या १०व्या सीझनमध्ये एका सामन्यात या चारही गोलंदाजांनी आरसीबीची वाईट अवस्था केली होती.
या चार गोलंदाजांमध्ये नाथन कुल्टरनाइल, क्रिस वोक्स, गॅंडहोम आणि उमेश यादव यांचा समावेश आहे. हे चारही खेळाडू गेल्यावेळी नाइट रायडर्सकडून खेळत होते. आयपीएल दहाच्या एका सामन्यात या चारही खेळाडूंमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची संपूर्ण टीम ४९ रन्सवर ऑल-आऊट झाली होती. अनेक दिग्गज असूनही या खेळाडूंनी आरसीबीला सळो की पळो करून सोडले होते. तेव्हा या टीममध्ये विराट कोहली, क्रिस गेल आणि एबी डिविलियर्स सारखे धमाकेदार फलंदाज होते. पण यावेळच्या लिलावात बंगळुरू टीमने या गोलंदाजांना आपल्या टीममध्ये घेतले.
आयपीएल १०च्या एका सामन्यात कोहलीच्या नेतृत्वातील टीम बंगळुरूचा सामना गौरतम गंभीरच्या नेतृत्वातील कोलकाता नाइट रायडर्ससोबत झाला होता. क्रिकेट चाहत्यांना हा सामना रोमांचक होणार असा अंदाज होता. पण झाले उलटेच. आरसीबी केवळ ४९ रन्सवर रोखली गेली.
केकेआरच्या या ४ गोलंदाजांनी कोहलीच्या टीमला दमदार मात दिली होती. नाथन कुल्टरनाइल आणि क्रिस वोक्सने ३-३ विकेट घेतल्या होत्या. ग्रॅंडहोमने सुद्धा ३ विकेट घेतल्या होता. तर उमेश यादवने एक विकेट घेतली होती.