केपटाऊन : भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन कसोटी, सहा वनडे आणि तीन टी-२० सामन्यांसाठी सज्ज झालाय. पाच जानेवारीपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. केपटाऊनमधील न्यूलँड्समध्ये पाच जानेवारीला भारत आणि द. आफ्रिका आमनेसामने असतील.
या दौऱ्यात कर्णधार विराट कोहलीसमोर विजयाचे मोठे आव्हान असणार आहे. कारण गेल्या २५ वर्षात द. आफ्रिकेत भारत एकदाही कसोटी मालिका जिंकलेला नाही. त्यामुळे २५ वर्षांचा इतिहास पुसण्यासाठी कोहली अँड कंपनी सज्ज झालीये.
पहिल्या कसोटीत शिखरच्या खेळण्याबाबत साशंकता होती. मात्र आता असं समजतयं की शिखर धवन पूर्णपणे फिट आहे. मात्र आणखी एका खेळाडूने कोहलीची समस्या वाढवलीये.
भारताचा अष्टपैलू क्रिकेटर रवींद्र जडेजा शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटीत खेळण्याबाबत साशंक आहे. गेल्या दोन दिवसांपासून तो आजारी आहे. त्यामुळे तो या सामन्यात खेळणार की नाही याबाबत शंका आहे.
सलामी फलंदाज शिखर धवनच्या पायाच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरला असून पहिल्या सामन्यासाठी तो तयार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ(बीसीसीआय)ने बुधवारी ही माहिती दिली.
बीसीसीआयच्या माहितीनुसार, रवींद्र जडेजा गेल्या दोन दिवसांपासून व्हायरल तापाने हैराण आहे. बीसीसीआयची मेडिकल टीम त्याची काळजी घेत आहे. पुढील ४८ तासांत तो बरा होईल अशी आशा आहे. तो पहिल्या सामन्यात खेळणार की नाही याबाबतचा निर्णय सामन्याच्या दिवशीच होईल.
दरम्यान, धवन पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि पहिल्या सामन्याच्या निवडीसाठी सज्ज आहे. दक्षिण आफ्रिकेला भारतीय संघ रवाना होण्यापूर्वी धवनच्या पायाला दुखापत झाली होती.