निवृत्तीच्या चर्चेवर रविंद्र जडेजा पहिल्यांदाच उत्तर

टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्याआधी, रवींद्र जडेजा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार, अशा चर्चेला उधाण आलं आहे.

Updated: Dec 16, 2021, 01:01 PM IST
निवृत्तीच्या चर्चेवर रविंद्र जडेजा पहिल्यांदाच उत्तर title=

मुंबई : टीम इंडिया आज दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी रवाना झाली आहे. टीम इंडियाला 26 डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. संघाचे दोन स्टार खेळाडू रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर आहेत.

दरम्यान, टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्याआधी, रवींद्र जडेजा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार, अशा चर्चेला उधाण आलं आहे. मात्र दुसरीकडे जडेजाची स्थिती वेगळी असल्याचं सांगण्यात येत आहे. जडेजाची दुखापत गंभीर असून तो चार ते सहा महिने क्रिकेटपासून दूर राहू शकतो आणि अशा परिस्थितीत तो कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्ती घेऊ शकतो, असं यावेळी सांगण्यात आलं होतं. 

रवींद्र जडेजाने थेट काहीही सांगितलं नसलं तरी बुधवारी त्याने दोन वेगवेगळ्या ट्विटद्वारे या चर्चांचं खंडन केलं आहे.

स्टार खेळाडू रवींद्र जाडेजाने एक फोटो शेअर केला आहे ज्यात लिहिलं की, 'खोटे मित्र अफवांवर विश्वास ठेवतात. खरे मित्र तुमच्यावर विश्वास ठेवतात.' थोड्या वेळाने, त्याने कसोटी संघाच्या जर्सीमध्ये आपला फोटो टाकला आणि लिहिले, 'लॉन्ग वे टू गो'.

33 वर्षीय जडेजा सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून तो उत्तम कामगिरीने संघाच्या विजयात मोलाचं योगदान देतो. विदेशी दौऱ्यांवर तो टीम इंडियाची पहिली पसंती ठरला आहे. अलीकडेच तो इंग्लंडविरुद्ध चारही सामने खेळला.

जडेजाच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, डावखुरा फिरकीपटूने आतापर्यंत 57 कसोटी सामन्यांमध्ये 232 विकेट्स घेतल्या आहेत. गोलंदाजीसोबतच त्याने फलंदाजीतंही छाप पाडली आहे. त्याने 17 अर्धशतके आणि एका शतकासह 2195 धावा केल्या आहेत.