मुंबई : ५०व्या कसोटी सामन्याआधी टीम इंडियाचा ऑफ स्पिनर आर आश्विन याने सोमवारी गॉल मैदानावर पाऊल ठेवल्यानंतर त्याच्यासाठी गुडन्यूज मिळाली. अश्विनने या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध २०१५ मध्ये १० विकेट घेतल्या होत्या. आता पुन्हा एकदा याच मैदानावर श्रीलंकेविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली आणि त्याच्यासाठी ही संधी शुभ ठरली. या मैदानावर पहिल्या सामन्यात पहिल्या डावात अश्विनने आपल्या नावावर एक वर्ल्ड रेकॉर्ड केलाय.
श्रीलंकेच्या पहिल्या सामन्यात दुसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या फलंदाजांनीनंतर गोलंदाजानी आपला करिश्मा दाखवला आणि पाच विकेट झटपट घेतल्या. या पाच विकेटमध्ये आर अश्विनने एक विकेट घेतली. या मैदानावर आल्यानंतर ३६ वर्षांपूर्वीचा जुना रेकॉर्ड अश्विनने मोडला.
अश्विनने न्यूझीलंडचा जलदगती बॉलर सर रिचर्ड हेडलीचा ५० कसोटीत सर्वाधिक विकेट घेण्याचा रेकॉर्ड मोडला. अश्विनने २७५ विकेट घेतल्या आहेत. तर ५० सामन्यात हेडलीने २६२ विकेट आपल्या नावावर केल्या होत्या. आर अश्विनला माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी दिली होती. या संधीचे त्यांने सोने केलेय. त्याने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना हा नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय.