'कोहली खूप वाईट कंटाळलाय त्याला ब्रेकची गरज', दिग्गज क्रिकेटपटूचा दावा

कोहलीचं करिअर त्याच्या खराब फॉर्ममुळे धोक्यात येणार का असा प्रश्नही काही दिग्गज उपस्थित करत आहेत. 

Updated: Apr 20, 2022, 01:32 PM IST
'कोहली खूप वाईट कंटाळलाय त्याला ब्रेकची गरज', दिग्गज क्रिकेटपटूचा दावा  title=

मुंबई : विराट कोहली गेल्या दोन वर्षात अत्यंत तणावाखाली असल्याचं जाणवत आहे. त्याच्या नेतृत्वामध्ये टीम इंडियाला शेवटच्या काही सामन्यात यश मिळत नव्हतं. त्याने कर्णधारपद सोडून बॅटिंगवर लक्ष केंद्रीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र अजूनही विराटला फलंदाजीमध्ये यश येत नाही. 

विराट कोहली आयपीएलमध्ये कधी शतक ठोकेल याची आशा चाहते लावून बसले आहेत. मात्र बंगळुरूकडून खेळताना विराट कोहलीला जास्त धावा करण्यात अजूनतरी यश आलं नाही. लखनऊ विरुद्धच्या सामन्यात तो पुन्हा गोल्डन डकआऊट झाला.

टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री यांनी विराट कोहलीवर मोठं विधान केलं. 'खेळाडूबद्दल सहानुभूती ठेवायला हवी. प्रत्येकवेळी आग्रह धरून चालत नाही. निर्णय घेताना समजूदारपणा दाखवावा लागतो.' 

'कोहली अत्यंत वाईट पद्धतीनं सगळ्याला कंटाळला आहे. त्याला एक ब्रेकची आवश्यकता आहे. दीड ते दोन महिने असो किंवा कसाही पण त्याला एका ब्रेकची नितांत आवश्यकता आहे. कोहलीला आरामाची गरज आहे.' 

'कोहलीची अजून 6 ते 7 वर्ष उरली आहेत. त्यामुळे त्याला अशा तणावाच्या स्थितीत गुरफटलेलं पाहाणं कोणालाच आवडणार नाही. तो आणखी खचत जाईल. त्याला या अडचणीचा सामना करावा लागेल पण त्यासाठी त्याला वेळ द्यायला हवा', असं रवी शास्त्री म्हणाले आहेत. 

विराट कोहलीनं क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटसोबत RCB चं कर्णधारपदही सोडलं. तो फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करेल अशी सर्वांना आशा होती. आयपीएलमध्ये कोहलीनं अर्धशतकही झळकवलं. कोहलीला अजून म्हणावं तेवढं यश मिळत नसल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये नाराजी आहे. 

कोहलीचं करिअर त्याच्या खराब फॉर्ममुळे धोक्यात येणार का असा प्रश्नही काही दिग्गज उपस्थित करत आहेत. त्यामुळे कोहलीला टीम इंडियाच्या व्यस्त वेळापत्रकातून ब्रेक दिला जाणार का हे पाहावं लागणार आहे.