विजयाच्या आनंदात प्रशिक्षक रवी शास्त्रींकडून कॅमेरासमोरच अपशब्द

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा ३१ रननी विजय झाला.

Updated: Dec 10, 2018, 06:09 PM IST
विजयाच्या आनंदात प्रशिक्षक रवी शास्त्रींकडून कॅमेरासमोरच अपशब्द title=

ऍडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा ३१ रननी विजय झाला. ऍडलेडच्या मैदानात भारताला याआधी १५ वर्षांपूर्वी २००३ साली टेस्ट मॅच जिंकता आली होती. तर ऑस्ट्रेलियात १० वर्षानंतर पहिल्यांदाच भारताला टेस्ट मॅच जिंकता आली. २००८ साली पर्थमध्ये भारतानं टेस्ट मॅच जिंकली होती. या विजयाबरोबरच भारतानं ४ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये १-०नं आघाडी घेतली आहे. या विजयानंतर भारतीय टीमच्या खेळाडूंबरोबरच प्रशिक्षक रवी शास्त्रीही चांगलेच खुश होते.

मॅच जिंकल्यानंतर रवी शास्त्रींनी मैदानात येऊन मुलाखतही दिली. यावेळी सुनील गावसकर यांनी दिलेल्या सल्ल्यावर उत्तर देताना रवी शास्त्रींची जीभ घसरली. अपशब्द वापरल्यामुळे रवी शास्त्री सोशल नेटवर्किंगवर ट्रोल होत आहेत. रवी शास्त्रींनी भारतीय टीम आणि खेळाडूंबद्दल चर्चा केली. रोमांचक झालेल्या या मॅचवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. पण त्याचवेळी रवी शास्त्रींनी हिंदीमध्ये अपशब्द काढले.

मॅच जिंकल्यानंतर मायकल क्लार्क, मार्क बाऊचर आणि सुनील गावसकर यांनी रवी शास्त्रींची मुलाखत घेतली. पण सुनील गावसकर यांनी शास्त्रींना कोणताच प्रश्न विचारला नाही. मुलाखतीच्या शेवटी मात्र गावसकर यांनी शास्त्रींशी संवाद साधला. ''रवी सगळ्यात पहिले विजयाच्या शुभेच्छा, मला माहिती नाही याबद्दल तुला कल्पना आहे का नाही. पण इकडे एक टॅगलाईन प्रसिद्ध आहे. मी तुला एवढच सांगू इच्छितो छोडना मत'', असं गावसकर रवी शास्त्रींना म्हणाले. यावर ''बिलकुल छोडेंगे नही'', असं शास्त्री म्हणाले. पण यानंतर बोलताना रवी शास्त्रींनी अपशब्द वापरले.

Tweet

रवी शास्त्रींनी वापरलेले हे शब्द आम्ही लिहू शकत नाही. पण या अपशब्दांनंतर रवी शास्त्रींवर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे. काही जणं शास्त्रींना सोशल नेटवर्किंगवर ट्रोलही करत आहेत.

Tweet

भारतानं ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी ३२३ रनचं आव्हान ठेवलं होतं. पण ऑस्ट्रेलियाचा २९१ रनवर ऑल आऊट झाला आणि भारतानं मॅच ३१ रननी जिंकली. ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या खेळाडूंनी चिकाटीनं बॅटिंग करत भारताचा तणाव वाढवला होता, पण मॅच जिंकवण्याची कामगिरी मात्र त्यांना करता आली नाही.