विदर्भाला दुसऱ्यांदा 'रणजी' जिंकवून देणारा फैज फझल दिग्गजांच्या यादीत

विदर्भाच्या टीमनं सलग दुसऱ्यांदा रणजी ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे.

Updated: Feb 7, 2019, 06:19 PM IST
विदर्भाला दुसऱ्यांदा 'रणजी' जिंकवून देणारा फैज फझल दिग्गजांच्या यादीत title=

नागपूर : विदर्भाच्या टीमनं सलग दुसऱ्यांदा रणजी ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. सौराष्ट्रविरुद्ध झालेल्या फायनलमध्ये विदर्भाचा ७८ रननी विजय झाला आहे. या दोन्ही वर्षी फैज फझल हा विदर्भाच्या टीमचा कर्णधार होता. या विजयामुळे फैज फैझलचा लागोपाठ २ वेळा रणजी ट्रॉफी जिंकणाऱ्या दिग्गज कर्णधारांच्या यादीत समावेश झाला आहे.

फैज फैझल हा लागोपाठ २ वेळा रणजी ट्रॉफी जिंकणारा ११वा कर्णधार झाला आहे. सगळ्यात पहिले ही कामगिरी महाराष्ट्राच्या डीबी देवधर यांनी १९४०-४१ च्या रणजी मोसमात केली होती. बापू नाडकर्णी यांच्या नेतृत्वात मुंबईनं १९६४, ६५ आणि ६६ या लागोपाठ तीन मोसमात रणजी ट्रॉफी जिंकली. लागोपाठ तीनवेळा रणजी ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम फक्त बापू नाडकर्णी यांच्याच नावावर आहे. तर मुंबईनच अजित वाडेकर यांच्या नेतृत्वात लागोपाठ २ वेळा रणजी ट्रॉफी जिंकली होती.

पाचव्या दिवशी सौराष्ट्रला विजयासाठी १४८ रनची आवश्यकता होती. पण आदित्य सरवटेनं उत्कृष्ट कामगिरी करत विदर्भला आणखी एक रणजी ट्रॉफी मिळवून दिली. आदित्य सरवटेनं या मॅचमध्ये एकूण ११ विकेट घेतल्या. यातल्या ६ विकेट शेवटच्या इनिंगमधल्या आहेत. विदर्भाच्या टीमनं सौराष्ट्रला विजयासाठी २०६ रनचं आव्हान दिलं होतं. आदित्य सरवटेबरोबरच अक्षय वाखरेनंही या मॅचमध्ये सौराष्ट्रच्या ७ विकेट घेतल्या. आदित्य आणि अक्षयनं या मॅचमध्ये एकूण १८ विकेट घेऊन सौराष्ट्रच्या बॅटिंगला खिंडार पाडलं.

विदर्भाच्या या विजयानंतर फैज फझल आनंदी होता. मॅचनंतर फैज फझल म्हणाला 'हे अजूनही खरं वाटत नाही. या विजयामागे प्रत्येकाची कठोर मेहनत आहे. पहिल्या वेळी विजय मिळवणं नेहमीच खास असतं, पण यावेळचा विजय वेगळा आहे. रणजी मोसम सुरु नसताना प्रत्येक खेळाडूनं कठोर परिश्रम केले. संपूर्ण मोसमातल्या कामगिरीबद्दल खुश आहे, पण फायनलमध्ये कामगिरीमुळे जास्त आनंद झाला आहे. खेळाडूच नाही तर टीममधल्या प्रत्येक जणांनी पाठिंबा दिला. आणखी काही वर्ष मी खेळू शकीन, अशी अपेक्षा आहे.'

विदर्भाचा बॅट्समन वसीम जाफरची ही १०वी रणजी ट्रॉफी आहे. मुख्य म्हणजे वसीम जाफरनं त्याच्या कारकिर्दीत १० रणजी ट्रॉफी फायनल खेळल्या आहेत. यातल्या ८ वेळा वसीम जाफर मुंबईच्या टीममध्ये होता.