चेन्नई : तामीळनाडूमध्ये सध्या कावेरीच्या पाण्याचा वाद सुरु आहे. कावेरी प्रबंधन बोर्डाची स्थापना न झाल्यामुळे रविवारी तामीळनाडू अॅक्टर्स असोसिएशननं विरोध-प्रदर्शन आयोजीत केलं होतं. यामध्ये तामीळनाडूचे प्रमुख अभिनेते उपस्थित होते. यामध्ये रजनीकांत, इलैया राजा, कमल हसन, धनुष, विजय हे कलाकार आंदोलनाच्या ठिकाणी आले. या आंदोलनावेळी चेन्नईच्या टीमनं हातावर काळी पट्टी बांधावी अशी मागणी रजनीकांतनं केली.
या सगळ्या वादानंतर चेन्नईमध्ये मॅच होणार का नाही याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. कावेरीचा पाणी प्रश्न पेटल्यामुळे चेन्नईच्या मॅच केरळमध्ये हलवण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण या शक्यता राजीव शुक्ला यांनी फेटाळून लावल्या आहेत. वेळापत्रकानुसारच चेन्नईमध्ये मॅच होतील. सुरक्षेसाठी योग्य पावलं उचलण्यात आली आहेत. खेळाला राजकारणामध्ये आणणं चुकीचं असल्याचं राजीव शुक्ला म्हणालेत.
#IPL2018 matches in Chennai will be held as per the schedule. Adequate security measures have been taken. IPL should not be dragged into political controversies: Rajeev Shukla, IPL Chairman #CauveryWaterManagement pic.twitter.com/uQZZyDlLzC
— ANI (@ANI) April 9, 2018
कावेरी नदीच्या पाणी वादावरून चेन्नईत होणाऱ्या मॅचवर बहिष्कार टाकण्याची मागणी शशिकला यांचा भाचा टीवी दिनकरन यांनी केली होती. कावेरी वाद सुरु असताना चेन्नईमध्ये मॅच खेळवणं योग्य नाही पण जर खेळाडूंना खेळायचंच असेल तर त्यांनी काळ्या पट्ट्या बांधाव्यात, असं रजनीकांत म्हणाले आहेत. कावेरी प्रबंधन बोर्ड आणि सीडब्ल्यूआरसीची स्थापना झाली तरच कावेरीचा मुद्दा सुटेल आणि न्यायाचा विजय होईल, अशी प्रतिक्रिया रजनीकांत यांनी दिली.
क्रिकेटपासून रसिकांनी लांब राहावं, असं आवाहन एएमएमकेचे नेते दिनकरन यांनी केलं आहे. कावेरी प्रबंधन बोर्डाची स्थापना करून शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी नागरिकांनी मॅचपासून लांब राहावं, असं दिनकरन म्हणालेत.
चेन्नईमध्ये मॅचला विरोध होत असतानाच राज्य सरकारनं मात्र मॅचना योग्य सुरक्षा व्यवस्था पुरवली जाईल, असं आश्वासन दिलं आहे. आयोजकांनी सुरक्षेची मागणी केली तर त्यांना आम्ही नाही म्हणू शकत नाही, असं वक्तव्य एआयएडीएमकेचे नेते आणि मंत्री डी जयकुमार यांनी केलं आहे. १० एप्रिल ते २० मे पर्यंत चेन्नईमध्ये ७ मॅच होणार आहेत.
चेन्नईच्या स्टेडियममध्ये होणाऱ्या मॅचवेळी काळे कपडे घालून येणाऱ्या प्रेक्षकांवर बंदी घालावी अशी मागणी पोलिसांनी बीसीसीआयकडे केली आहे. काळे कपडे घालून आलेल्या व्यक्तीला स्टेडियममध्ये घुसून देऊ नका, असं पोलिसांनी बीसीसीआयला सांगितलं आहे. तसंच चेन्नईमध्ये होणाऱ्या मॅचसाठी सेकंड लेयर सुरक्षा देण्यात येईल, असं आश्वासन चेन्नई पोलिसांनी दिलं आहे.