भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात महागडा प्रशिक्षक, जाणून घ्या इतकं असणार वेतन

बीसीसीआयने (BCCI ) राहुल द्रविडची (RAHUL DRAVID) टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे

Updated: Nov 4, 2021, 03:28 PM IST
भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात महागडा प्रशिक्षक, जाणून घ्या इतकं असणार वेतन title=

मुंबई : भारतीय क्रिकेट बोर्डाने (BCCI) बुधवारी माजी कर्णधार राहुल द्रविडची (RAHUL DRAVID) टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी (CHIEF COACH) नियुक्ती केली. या पदासाठी राहुल द्रविडची नियुक्ती निश्चित मानली जात होती. राष्ट्रीय क्रिकेट अॅकाडमीचे (NCA) प्रमुख म्हणून काम केलेला राहुल द्रविड भारतात 2023 मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेपर्यंत मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे. 

T20 विश्वचषक स्पर्धेनंतर न्यूझीलंडविरुद्ध 17 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या क्रिकेट मालिकेपासून राहुल द्रविड आपल्या पदाची जबाबदारी स्विकारेल. 

बीसीसीआयची पहिली पसंती

भारतीय क्रिकेट संघाची भिंत (The Wall) म्हणून ओळखाला जाणारा राहुल द्रविड बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांची पहिली पसंती होता. मिळालेल्या माहितीनुसार या पदासाठी राहुल द्रविड तयार नव्हता, पण बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांनी राहुल द्रविडशी चर्चा करत त्याला पदासाठी मनधरणी केली. यानंतर राहुल द्रविडने मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला. 

राहुल द्रविडचं वेतन

राहुल द्रविडची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर त्याचं वेतन किती असणार याबद्दल क्रिकेट प्रेमींना उत्सुकता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार राहुल द्रविडचं वार्षिक वेतन हे जवळपास 10 कोटींपर्यंत असणार आहे. भारतीय क्रिकेट इतिहासात आतापर्यंत प्रशिक्षकला देण्यात येणारी ही सर्वाधिक रक्कम आहे. टीम इंडियाचे सध्याचे प्रशिक्षक रवि शास्त्री यांना 8 कोटींपर्यंत वेतन आहे. टी20 विश्वचषकानंतर रवि शास्त्री यांचा कार्यकाळ संपत आहे.

द्रविडच्या नावावर शानदार विक्रम

भारतीय क्रिकेटमध्ये एक काळ गाजवणार राहुल द्रविड सचिन तेंडुलकरनंतर सर्वाधिक धावा करणारा क्रिकेटपटू आहे. द्रविडच्या नावावर 164 सामन्यात 13 हजार 288 धावा जमा आहेत. तर तब्बल 36 सेंच्युरी त्याच्या नावावर आहेत. एकदिवसीय सामन्यात द्रविडने 10 हजार 889 धावा केल्या आहेत.  द्रविडला अंडर-19 क्रिकेट संघासोबत काम करण्याचा अनुभव आहे. ऋषभ पंत, ईशान किशन, हनुमा विहारी, पृथ्वी शॉ, शुभमन गिल या सारखे खेळाडू द्रविडच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले आहेत.

प्रशिक्षकाच्या जबाबदारीसाठी तयार

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर आपल्यासाठी हा मोठा सन्मान असल्याची प्रतिक्रिया द्रविडने दिली आहे. या जबाबदारीसाठी आपण पूर्ण तयार असल्याचं द्रविडने म्हटलं आहे. रवि शास्त्री यांच्या मार्गदर्शनाकाली भारतीय क्रिकेट संघाने मोठी कामगिरी केली आहे. मला अपेक्षा आहे हीच कामगिरी आपण पुढे घेऊन जाऊ अशी प्रतिक्रिया द्रविडने व्यक्त केली आहे.

राहुल द्रविड एक महान खेळाडू

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरभ गांगुली यानेही राहुल द्रविडचं कौतुक केलं आहे. एक खेळाडू म्हणून द्रविडची कारकिर्द शानदार आहे, तो एक महान खेळाडू आहे असं सौरभ गांगुली याने म्हटलं आहे.