Dabang Delhi Vs Puneri Paltan in PKL 11: वेगवान आणि खोलवर चढाई करणाऱ्या आशु मलिकच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर प्रो कबड्डीच्या 11व्या पर्वात सोमवारी दबंग दिल्लीने घरच्या मैदानावर पुणेरी पलटणचा 30-26 असा पराभव केला. या विजयाने दबंग दिल्लीने बाद फेरीच्या आशा भक्कम करताना चौथ्या स्थानावर झेप घेतली. पुणेरी पलटण मात्र आठव्या स्थानावर कायम राहिले. यामुळे गतविजेत्या पुणेरी पलटणला आता उर्वरित प्रत्येक सामना जिंकला तरच या वेळी बाद फेरी गाठता येणार आहे.
सामन्याचे एकूण चित्र दोन्ही संघांच्या सावध पवित्र्यामुळे समान वर्चस्वाचे राहिले होते. पूर्वार्धात बचावपटूंनी आपल्या संघाचे आव्हान राखण्याचा प्रयत्न केला. उत्तरार्धात मात्र पलटणने चढाई आणि बचाव अशा दोन्ही आघाडीवर खेळ उंचावताना दबंग दिल्लीवर दडपण आणण्याचा चांगला प्रयत्न केला. मात्र, उत्तरार्धाच्या तिसऱ्याच मिनिटाला आशु मलिकच्या एका चढाईतील पाच गुणांनी सामन्याचे चित्र बदलले. त्यानंतरही पलटणच्या अबिनेश नंदराजन आणि मोहित गोयत यांनी दोनवेळा अव्वल पकड करताना त्या पाच गुणांचे दडपण झुगारले. मात्र, त्यानंतर आशु आणि महत्वाच्या क्षणी नविन कुमारला रोखण्यात पलटणची बचावफळी चुकली. सामना 21-21 अशा बरोबरीत असताना नविनच्या एका खोलवर चढाईत पलटणचे दोन्ही कोपरारक्षक स्वयंचित झाले आणि आशुच्या पाच गुणानंतरही आव्हान राखलेल्या पलटणसाठी ही सर्वात मोठी चूक ठरली. ही संधी साधून नंतर आशु आणि नविनने चोख चढाया करुन दोन मिनिट शिल्लक असताना पलटणवर लोण चढवला. या क्षणी पलटणचा पराभव निश्चित झाला. या सामन्यातून पुण्याच्या गौरव खत्री आणि दिल्लीच्या योगेशने हंगामातील बचावातील गुणांचे अर्धशतक पूर्ण केले. आशु मलिकने केलेल्या 19 चढाईपैकी सहा चढाईतच 13 गुणांची कमाई केली. उत्तरार्धात दिल्लीला बाचावातील केवळ दोन गुणांचीच कमाई करता आली. पलटणकडून पंकज मोहिते (5) आणि मोहित गोयत (7) यांनाच चमक दाखवता आली.
उत्तरार्धात देखील फारसे वेगळे चित्र नव्हते. कुणीच धोका पत्करण्यास तयार नव्हते. पण, उत्तरार्धातील तिसऱ्या मिनिटाला आशुने आपल्या सफाईदार चढाईने पलटणचा बचाव भेदत पाच गडी बाद केले. पलटण या चढाईने मागे राहतील असे वाटले. मात्र, लोणची शक्यता त्यांच्या बचावपटूंनी फेटाळून लावली. प्रथम अबिनेशने दोन खेळाडूंत आशुची आणि काही वेळाने मोहितने अबिनेशच्या साथीत नविन कुमारची पकड करुन लागोपाठ अव्वल पकडीचे चार गुण मिळवून दिल्लीवर पलटवार केला. त्यामुळे उत्तरार्धाचे पहिले सत्र संपले तेव्हा दिल्लीची आघाडी 20-18 अशी दोन गुणांची मर्यादित राहिली होती.
दुसऱ्या सत्रात पलटणला बचावापेक्षा मोहित गोयतच्या चढायांची साथ मिळाली होती. त्याने दिल्लीच्या बचावफळीचा अभ्यास करत सातत्याने मध्यरक्षकावर लक्ष केंद्रित करुन गडी टिपले. अमनने आशुचा चवडा अचूक पकडून पलटन संघाला प्रथमच 21-21 असे बरोबरीत आणले. सामना असाच बरोबरीत चालणार असेच वाटत असताना नविनच्या एका खोलवर चढाईवर पलटणचे दोन बचावपटू स्वयंचित झाले. त्यानंतर आशुने एका चढाईत दोन गडी टिपले आणि आकाश शिंदेची पकड करुन दोन मिनिट शिल्लक असताना दिल्लीने पलटणवर लोण देत संघाची आघाडी 29-25 अशी भक्कम केली. त्यानंतर पुन्हा एकदा सावध खेळ करुन दबंग दिल्लीने विजयला अलगद गवसणी घातली.