'क्रिकेट सोडून त्याच्या इतर सर्व गोष्टी वाढल्या आहेत,' पृथ्वी शॉला संघर्षात मदत करणारे प्रशिक्षक नाराज; 'त्याचं अस्तित्व...'

एकेकाळी आगामी सचिन तेंडुलकर असा उल्लेख केल्या जाणाऱ्या पृथ्वी शॉची घसरण पाहून त्याचे बालपणीचे प्रशिक्षक दु:खी झाले आहेत.  

शिवराज यादव | Updated: Dec 2, 2024, 02:54 PM IST
'क्रिकेट सोडून त्याच्या इतर सर्व गोष्टी वाढल्या आहेत,' पृथ्वी शॉला संघर्षात मदत करणारे प्रशिक्षक नाराज; 'त्याचं अस्तित्व...' title=

भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉने वयाच्या 23 व्या वर्षीय 30 ते 40 कोटी कमावल्याच्या दाव्यांदरम्यान त्याचे बालपणीचे प्रशिक्षक संतोष पिंगुटकर यांनी त्याची घसरण पाहून चिंता व्यक्त केली आहे. एकेकाळी आगामी सचिन तेंडुलकर असा उल्लेख केला जाणारा पृथ्वी शॉ सध्या सर्वात खडतर प्रवासाचा सामना करत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून गेली 3 वर्षं दूर असणाऱ्या पृथ्वीला आता आयपीएलमध्येही कोणी खेळवण्यास तयार नाही. दिल्ली कॅपिटल्सने रिलीज केल्यानंतर दोन दिवसांच्या लिलावात एकाही संघाने त्याला विकत घेतलं नाही. पृथ्वीचे माजी प्रशिक्षक सौरव गांगुली, रिकी पाँटिंग आणि राहुल द्रविड लिलावात उपस्थित होते. पण पृथ्वी शॉचं नाव आलं तेव्हा एकानेही रस दाखवला नाही. 

शॉच्या घसरणीमुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. त्याला मुंबईच्या रणजी संघातून आधीच वगळण्यात आलं होतं. सध्या चालू असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याच्या 33, 0, 23 आणि 40 धावांनी त्यात आणखी भर टाकली आहे. अशा परिस्थितीत, शॉला त्यांच्या सुरुवातीच्या काळात मदत करणारे पिंगुटकर यांनी आगामी काळात स्थिती सुधारेल अशी आशा व्यक्त केली आहे. 

'जर तुला विनोद कांबळी व्हायचं नसेल तर...', दिग्गजाने पृथ्वीला स्पष्टच सांगितलं होतं, 'वयाच्या 23 व्या वर्षी 30-40 कोटी कमावले...'

 

"तो फक्त 25 वर्षांचा आहे. अजूनही त्याच्या हातात बराच मोठा काळ आहे. जर त्याला क्रिकेटमध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवायचं असेल तर त्याला पुनरागमन करावं लागेल," असं संतोष पिंगुटकर यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधताना सांगितलं. 

'सचिन तेंडुलकर आणि इतर मूर्ख आहेत का?', निवडकर्ता पृथ्वी शॉवर संतापला; म्हणाला 'इतकं सांगूनही काही बदल...'

 

"त्याच्या खेळाशिवाय इतर सर्व गोष्टींमध्ये वाढ झाली होती. तो क्रिकेटच्या बाहेर त्याच्या ग्रुप्समध्ये अधिक सामील होता. परंतु, त्याला क्रिकेट आवडते यात शंका नाही. तथापि, तो खेळावरील प्रेमाचे त्याच्या प्रयत्नांमध्ये रूपांतर करू शकला नाही. त्यामुळेच तो अशा दुबळ्या टप्प्याचा साक्षीदार आहे. जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर त्याने पुनरागमन करावं. प्रत्येकाच्या शुभेच्छा त्याच्यासह आहेत," असं संतोष पिंगुटकर यांनी म्हटलं आहे. 

'जर तुला विनोद कांबळी व्हायचं नसेल तर...'

"तीन वर्षांपूर्वी मी त्याला विनोद कांबळीचं उदाहरण दिल होतं. मी विनोद कांबळीची अधोगती फार जवळून पाहिली आहे. या पिढीला काही गोष्टी शिकवणं सोपं नाही. दिल्ली कॅपिटल्सने त्याला रिटेन केलं हे त्याचं नशीब. 23 वर्षांचा असताना त्याने 30 ते 40 कोटी कमावले असतील. आयआयए पदवीधरालाही इतका पैसा मिळत असेल का? जेव्हा तुम्ही इतक्या कमी वयात पैसा कमावता तेव्हा भरकटण्याची शक्यता असते. पैशांचं व्यवस्थापन कसं करायचं हे तुम्हाला माहिती हवं. चांगले मित्र असणं, क्रिकेटला प्राधान्य देणं गरजेचं आहे," असं दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाचे माजी प्रशिक्षक प्रवीण आमरे (Pravin Amre) यांनी सांगितलं.

"त्याच्यासारख्या चांगल्या खेळाडूची अधोगती पाहणं हे फार वाईट आहे. कोणीतरी मला सांगितले की सय्यद मुश्ताक अली T20 ट्रॉफीसाठी मुंबईला रवाना होण्यापूर्वी, पृथ्वीने क्रिकेट क्लब ऑफ इंडियामध्ये सराव सामन्यात शानदार शतक ठोकले. आजही तो आयपीएलमध्ये 30 चेंडूत अर्धशतक ठोकू शकतो. कदाचित तो प्रसिद्धी आणि पैसा, आयपीएलचे दुष्परिणाम हाताळू शकला नाही. त्याचे उदाहरण म्हणजे भारतीय क्रिकेटमधील केस स्टडी असू शकते. त्याचं जे झालं आहे ते इतर क्रिकेटपटूंच्या बाबतीत घडू नये," असं प्रवीण आमरे म्हणाले.