पॅरालम्पिक 2024 मध्ये भारताने जबरदस्त कामगिरी केली असून, संपूर्ण देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. भालाफेक F14 च्या फायनलमध्ये नवदीप सिंगने (Paralympian Navdeep Singh) भारताला सुवर्णपदक (Gold Medal) मिळवून देत इतिहास रचला आहे. भारताने पॅरालम्पिकमध्ये एकूण 29 पदकं जिकत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. 23 वर्षीय नवदीपने सुवर्णपदक जिंकल्यानंतर केलेलं आक्रमक सेलिब्रेनशही चर्चेचा विषय ठरला आहे. भालाफेक करताना 47.32 मीटरचं अंतर पार केल्यानंतर नवदीप सिंगने आक्रमक शैलीत आपलं यश साजरं केलं. त्याच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नवदीपला त्याच्या आवडत्या बॉलिवूड चित्रपटाबद्दल विचारण्यात आलं असता त्याने हॉरर कॉमेडी 'स्त्री 2' सर्वात जास्त आवडत असल्याचं सांगितलं. यावेळी होस्टने त्याला श्रद्धा कपूर यासाठी कारण आहे का? असं विचारलं असता त्याने, 'नाही, कारण मला तमन्ना भाटिया फार आवडते' असं म्हटलं.
नवदीप सिंग हा उत्तम नकलाकार असल्याचंही यावेळी उघड झालं. यावेळी त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींची मिमिक्री करण्यास सांगण्यात आलं. मात्र त्याने आदरपणे त्यास नकार दिला. तो म्हणाला की, "मी करु शकत नाही, मी त्यांचा फार आदर करतो. ते देशाचा अभिमान आहेत. यामुळे त्यांची नकल करणं योग्य ठरणार नाही".
नवदीप सिंगने नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीदरम्यान नरेंद्र मोदींनी नवदीप सिंगला त्याच्या आक्रमक सेलिब्रेशनबद्दल विचारत चिमटे काढले. व्हायरल झालेल्या या व्हिडीओत नरेंद्र मोदी नवदीप सिंगला विचारत आहेत की, 'तू व्हिडीओ पाहिलास की नाही, तू इतक्या आक्रमकतेने कामगिरी कशी करतोस?'.
यावर नवदीप सिंग उत्तर देतो की, "मागच्या वेळी (टोकियो पॅरालम्पिक) मी चौथ्या क्रमांकावर होतो. मी पॅरिसला जाण्याआधी तुम्हाला आश्वासन दिलं होतं. ते आश्वासन आता पूर्ण झालं आहे". यावेळी नवदीप सिंगने पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपल्या जॅकेटच्या डाव्या हातावर स्वाक्षरी करण्याची विनंती केली. नरेंद्र मोदींनीही त्याची विनंती मान्य करत स्वाक्षरी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पॅरालिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंची भेट घेऊन त्यांचे कौतुक आणि अभिनंदन केले. पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकलेला कमी उंचीचा भालाफेकपटू नवदीप सिंहने मोदींना कॅप (टोपी) घालण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी मोदींनी नवदीपच्या इच्छेखातर त्या कॅपचा स्वीकार केला. पंतप्रधान मोदी नवदीपकडून कॅप घालून घेण्यासाठी जमिनीवर बसले. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मोदींनी नवदीपला म्हटले की, 'तुम्ही तुमचा व्हिडिओ पाहिला का? सगळेच घाबरायला लागले आहेत'. त्याचे बोलणे ऐकून नवदीप हसला, मग तो म्हणाला की 'मला तुम्हाला टोपी घालायची आहे'. ही विनंती करताच पीएम मोदींनी जमिनीवर बसून नवदीपकडून टोपी घालून घेतली. मग मोदी म्हणाले, 'आता बघ तू माझ्यापेक्षा मोठा झाला आहेस'.