नवी दिल्ली : दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये राजस्थानचा ५ विकेटने पराभव झाला. या पराभवाबरोबरच राजस्थानचं प्ले ऑफमध्ये प्रवेशाचं स्वप्न भंगलं. पण या मॅचदरम्यान दिल्लीच्या ऋषभ पंतने विक्रमाला गवसणी घातली आहे. ऋषभ पंतने राजस्थानविरुद्ध ३८ बॉलमध्ये ५३ रन केले. यामध्ये २ फोर आणि ५ सिक्सचा समावेश होता. याचसोबत पंतने सेहवागचा रेकॉर्ड मोडित काढला आहे.
दिल्लीकडून खेळताना सर्वाधिक सिक्स मारण्याचा विक्रम ऋषभ पंतने केला आहे. पंतच्या नावावर आता ८८ सिक्स आहेत. याआधी आयपीएलमध्ये दिल्लीकडून सर्वाधिक सिक्स मारण्याचा रेकॉर्ड वीरेंद्र सेहवागच्या नावावर होता. सेहवागने दिल्लीकडून खेळताना ८५ सिक्स मारले होते.
ऋषभ पंत आणि सेहवागनंतर या यादीत श्रेयस अय्यरचा तिसरा क्रमांक लागतो. अय्यरने आत्तापर्यंत दिल्लीकडून खेळताना ६७ सिक्स लगावले आहेत. दरम्यान यंदाच्या आयपीएलमध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात दिल्लीने प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये दिल्ली १८ पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे.