हार्दिक पांड्याला कपिल देवनी दिला हा सल्ला

दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर ऑल राऊंडर हार्दिक पांड्यानं बॉलिंगमध्ये ठिकठाक कामगिरी केली पण बॅटिंगमध्ये मात्र पांड्यानं निराश केलं.

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Mar 2, 2018, 09:44 AM IST
हार्दिक पांड्याला कपिल देवनी दिला हा सल्ला  title=

मुंबई : दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर ऑल राऊंडर हार्दिक पांड्यानं बॉलिंगमध्ये ठिकठाक कामगिरी केली पण बॅटिंगमध्ये मात्र पांड्यानं निराश केलं. केप टाऊनमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये पांड्यानं 93 रन्सची खेळी केली पण यानंतर कोणत्याच मॅचमध्ये पांड्याला अर्धशतक झळकावता आलं नाही.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यात स्ट्रगल केलेल्या हार्दिक पांड्याला भारताचे माजी ऑल राऊंडर कपिल देव यांनी सल्ला दिला आहे. हार्दिकनं बॅटिंग सुधारण्यासाठी आणखी मेहनत घेणं गरजेचं आहे. एक ऑल राऊंडर म्हणून हार्दिकचं हे मुख्य कौशल्य आहे, असं कपिल देव म्हणाले आहेत.

1983 साली भारताला वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या कपिल देव यांच्याशी हार्दिक पांड्याची तुलना केली जाते. पण अशाप्रकारे कोणाबरोबरही तुलना केल्यामुळे हार्दिकवरचा दबाव वाढेल. हार्दिकनं खूलून खेळलं पाहिजे तसंच मैदानात क्रिकेटची पूर्ण मजा घेतली पाहिजे, अशी प्रतिक्रिया कपिल देव यांनी दिली आहे.

कोणत्याही ऑल राऊंडरची दोनपैकी एक गोष्ट मजबूत असते. पांड्या हा बॅटिंग ऑल राऊंडर आहे. पांड्यानं बॅटिंगवर आणखी मेहनत घेतली तर त्याला बॉलिंग करणं सोपं जाईल. बहुतेक ऑल राऊंडर सोबत असंच होतं, असा सल्ला कपिल देव यांनी दिला आहे.

पांड्याकडून जास्त अपेक्षा

पांड्या अजून तरुण आहे आणि त्याच्याकडून आपण जास्त अपेक्षा व्यक्त करत आहोत. पण पांड्यामध्ये उत्कृष्ठ खेळाडू व्हायची योग्यता आहे. यासाठी त्याला मेहनत घ्यावी लागेल, असं कपिल देव यांना वाटतं.

धोनीच्या शांत स्वभावाची गरज

2019 साली होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये भारताला कोहलीची आक्रमकता आणि धोनीच्या शांत स्वभावाची गरज आहे, असं कपिल देव म्हणाले आहेत. पण सगळ्यांनीच आक्रमक होऊन खेळलं तर चिंता वाढेल. म्हणून आक्रमकता आणि शांतपणा याचं मेळ बांधला तर टीमला फायदा होईल, असं कपिल देव म्हणाले.