Pakistan Media on India: भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा (India vs South Africa) 7 धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्डकप जिंकत इतिहास रचला आहे. भारताच्या विजयाची विदेशातही चर्चा सुरु आहे. वर्ल्डकप जिंकण्यात विराट कोहली, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या यासह प्रत्येक खेळाडूने मोलाची भूमिका निभावली. आपला शेजारी देश पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमातही भारताच्या विजयाची चर्चा सुरु आहे.
पाकिस्तानातील सर्व वृत्तपत्रं, न्यूज चॅनेल्स आणि माजी खेळाडूंनी भारताचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. पाकिस्तानी वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर भारताच्या विजयाची बातमी छापण्यात आली आहे. माजी खेळाडूंनी रोहित शर्माचं नेतृत्व आणि बुमराहच्या गोलंदाजीचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.
पाकिस्तानचा माजी दिग्गज खेळाडू शोएब अख्तरने तर आधीच भारताच्या विजयाची भविष्यवाणी केली होती. शोएब अख्तरने आपल्या युट्यूब चॅनेलवर सांगितलं की, "मी वारंवार सांगत होतो की, भारत फक्त हीच स्पर्धा नाही तर एकदिवसीय वर्ल्डकप जिंकण्यासही पात्र होता. रोहितकडून अहमदाबादमध्ये जी चूक झाली ती त्याने आज पूर्ण केली. हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांची स्तुती करावी तितकी कमी आहे. हा नक्कीच गोलंदाजांचा सामना होता, पण विराटनेही जबरदस्त खेळी केली. क्लासेन, डिकॉक आणि स्टब्स खेळत असताना भारताच्या हातून सामना गेला असं वाटत होतं. पण दबावातही गोलंदाजी कशी करायची हे रोहित शर्माने दाखवून दिलं".
विराट आणि रोहितच्या संन्यास घेण्याच्या निर्णयावर त्याने म्हटलं की, "विराट कोहली जगातील पहिल्या क्रमांकाचा फलंदाज आहे. रोहित शर्माही त्याच तोडीचा आहे. दोघांनी चांगल्या क्षणी टी-20 करिअरला पूर्णविराम दिला आहे. विराटचा संन्यास घेण्याचा निर्णय योग्य आहे".
पाकिस्तानी न्यूज चॅनेलवरील चर्चेत सहभागी झालेल्या पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनीही भारताचं कौतुक केलं. माजी क्रिकेटर कामरान अकमलने एआरवायवर संवाद साधताना म्हटलं की, "हार्दिक पांड्याने आपण जगातील पहिल्या क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू असल्याचं दाखवून दिलं आहे. त्याने क्लासेनचा विकेट घेतल्यानंतर बुमराह आणि अर्शदीपही त्याच मार्गावर गेले. मिलरने शेवटच्या क्षणापर्यंत सामना नेत चूक केली". दुसऱ्या एका क्रिकेटतज्ज्ञाने कौतुक करताना या स्पर्धेत भारताने सर्वात चांगलं क्षेत्ररक्षण आणि नेतृत्व केलं असल्याचं म्हटलं.
पाकिस्तानचा माजी क्रिकेटर आमीर सोहेल म्हणाला की, "भारतीय संघाने जबरदस्त खेळी केली. जेव्हा क्लासेन खेळत होता तेव्हा भारतीय संघाच्या खेळाडूंना पाहून ते आता पराभूत होतील असं वाटत होतं. पण बुमराहच्या गोलंदाजीने संघात पुन्हा जीव ओतला".
पाकिस्तानचे माजी कर्णधार रमीज राजा यांनीही भारतीय संघाचं तोंडभरुन कौतुक केलं. "बऱ्याच दिवसांनी असा सामना पाहायला मिळाला. भारतीय गोलंदाजांनी ज्याप्रकारे स्थितीची योग्य फायदा घेतला त्याचं कौतुक करायला हवं. भारताने अशक्य असा विजय मिळवला. एक खेळाडू तयार करण्यात अनेकांचा हात असतो. यामध्ये राहुल द्रविडचंही मोठं योगदान आहे. जसप्रीत बुमराहने जबरदस्त कामगिरी केली. त्याच्या ओव्हरमुळे दक्षिण आफ्रिकेवर दबाव वाढला. रोहितने ज्याप्रकारे बुमराह आणि अर्शदीपचा वापर केला ते पाहता त्याच्या नेतृत्वाचं कौतुक केलं पाहिजे".
'द डॉन'ने 'कोहलीच्या जबरदस्त खेळीमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत खिताब जिंकला' अशी हेडलाईन छापली आहे. त्यांना रोहित शर्माच्या नेतृत्वाचं कौतुक करत लिहिलं आहे की, "रोहितने बुमरहाला शेवटपर्यंत थांबवलं नाही आणि आधीच गोलंदाजीला बोलावलं. त्यानेही कर्णधाराच्या निर्णयाला सार्थ ठरवलं. 18 व्या ओव्हरला त्याने मार्को जेनसनला बोल्ड केलं आणि फक्त 2 धावा दिल्या".
'द एक्स्पेस ट्रिब्यून'ने लिहिलं आहे की, "विराट कोहलीने केलेल्या 76 धावांमुळे भारताने अखेरच्या ओव्हरपर्यंत रंगलेला सामना जिंकला". दिल्लीत भारतीय चाहते हा विजय साजरा कऱण्यासाठी हजारोंच्या संख्येने इंडिया गेटवर जमा झाला होते. या विजयासाठी चाहत्यांनी मंदिरांमध्ये पूजा केली होती असं सांगण्यात आलं आहे. तसंच रोहित आणि विराटच्या निवृत्तीच्या घोषणेलाही प्रमुख जागा दिली आहे.
'द पाकिस्तान टुडे' ने ' 17 वर्षांनी भारत दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड चॅम्पियन झाल्याचा उल्लेख केला आहे. वृत्तपत्रात एकीकडे विराट कोहलीच्या 76 धावांच्या खेळीचं कौतुक करण्यात आलं आहे तर दुसरीकडे गोलंदाजांवरही स्तुतीसुमनं उधळली आहेत. "विराट कोहली संपूर्ण स्पर्धेत संघर्ष करत होता. मात्र योग्य वेळी त्याने चांगली खेळी केली", असं त्यांनी लिहिलं आहे. तसंच अर्शदीने 19 व्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा देत दबाव कायम ठेवल्याबद्दल कौतुक केलं आहे.
'द नेशन' ने भारताच्या विजयाचा उल्लेख करत कोहलीने संन्यास घेतल्याच्या निर्णयाला मुख्य जागा दिली आहे. वृतपत्राने भारतीय संघाच्या जबरदस्त कामगिरीचं कौतुक करताना गोलंदाजांनी अंतिम क्षणी पुनरागमन केल्याचं म्हटलं.