पाकिस्तानी चाहत्यांनी फिटनेसवरुन उडवली सरफराजची खिल्ली

पाकिस्तानी कर्णधार सरफराज अहमदला चाहत्यांनी चांगलंय धारेवर धरलं आहे.

Updated: Jun 19, 2019, 01:49 PM IST
पाकिस्तानी चाहत्यांनी फिटनेसवरुन उडवली सरफराजची खिल्ली title=

नवी दिल्ली : भारत विरुद्धच्या सामन्यात पराभवानंतर पाकिस्तानी चाहत्यांकडून पाकिस्तानी संघावर सतत टीका सुरु आहे. आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारताकडून ८९ रनने पराभव झाल्यानंतर पाकिस्तानी कर्णधार सरफराज अहमदला चाहत्यांनी चांगलंय धारेवर धरलं आहे. सरफराजच नाही तर इतर खेळाडूंवर देखील टीका होत आहे. त्यानंतर आता आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये त्याला जाड असल्यावरुन चिडवलं जात आहे. पाकिस्तानी खेळाडूंच्या फिटनेसवरुन पाकिस्तानी फॅन्स नाराजी व्यक्त करत आहेत. 

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना झाल्यानंतर सरफराज मैदानावर उभा असताना प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका व्यक्तींने त्याला डिवचलं. सरफराज त्याच्याकडे वळून रागाने देखील बघत होता. पण तो त्याला चिडवतच होता.

मॅनचेस्टरच्या स्टेडिअमवर हा सगळा प्रकार घडला. त्यावेळी सरफराज कोच मिकी ऑर्थर सोबत उभा होता. भारताकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानी चाहत्यांमध्ये संतापाची लाट आहे. खेळाप्रती असलेली प्रेम, गांभीर्य आणि फिटनेस यावरुन पाकिस्तानी संघावर टीका होत आहे. 

भारताकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तान संघ ९ व्या स्थानावर आहे. २३ जूनला त्यांचा सामना दक्षिण आफ्रिके विरुद्ध लंडनमध्ये होणार आहे.

पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी खेळाडू शोएब अख्तरने देखील सरफराजच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 'सरफराज जेव्हा टॉससाठी येतो तेव्हा त्याचं मोठ पोट दिसतं. त्याचा चेहरा देखील मोठा आहे. अनफिट असलेला तो पहिला कर्णधार आहे. खेळाडूंची निवड कोणत्या निकषावर होते हे कळत नाही आहे.' अशा शब्दात त्याने सरफराजवर टीका केली आहे.