नवी दिल्ली : मागील वर्षी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीच्या तक्रार निवारण समितीपुढे जवळपास ७ कोटी युएस डॉलरच्या नुकसान भरपाईचा दावा करत एक प्रकरण ठेवलं होतं. यामध्ये त्यांची हार झाली आहे. पीसीबी अर्थात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी असणाऱ्या एहसान मनी यांनीच सोमवारी हा दावा केला. आयसीसीपुढे मांडण्यात आलेल्या प्रकरणात हार पत्करावी लागल्यामुळे पीसीबीला भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयला १६ लाख डॉलर्स इतकी मोठी रक्कम द्यावी लागली आहे. याचाच अर्थ पाकिस्तानला जवळपास ११ कोटींचा मोठा आर्थिक फटका बसला आहे.
पीसीबीने दाखल केलेल्या या प्रकरणात नमूद केल्यानुसार पाकिस्तान आणि भारत या दोन्ही संघांमध्ये सहा द्विपक्षीय क्रिकेट मालिका होणं अपेक्षित होतं. पण, भारताने ही मागणी मान्य केली नाही. यासंदर्भातच आपला पक्ष मांडताना भारताकडून काही गोष्टी स्पष्टपणे मांडण्यात आल्या. पाकिस्तानसोबतच्या या कराराचं पाल केलं गेलं नाही कारण सरकारकडूनच त्याविषयीची परवानगी मिळाली नाही. भारताची ही भूमिका कायदेशीररित्या चुकीची असून, या कराराचं पालन केलंच गेलं पाहिजे या भूमिकेवर पाकिस्तान ठाम होता. पण, भारताने पाकिस्तानचा हा दावाही फेटाळून लावला.
पीसीबीच्या अध्यक्षांनी नमूद केल्यानुसार भारताला देण्यात आलेल्या रकमेव्यतिरिक्त या प्रकरणाच्या एकंदर प्रक्रियेदरम्यानही कायदेशीर व्यक्तींचं मानधन, प्रवास खर्च सा खर्चही पाकिस्तानकडून देण्यात आला आहे. बीसीसीआयकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार पाकिस्तानकडून ज्या कराराला बेकायदेशीर ठरवण्यात आलं होतं तो फक्त एक प्रस्ताव होता. सध्याच्या घडीला पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आर्थिक संकटात असल्याचं म्हटलं जात आहे. त्यातच भारताला देण्यात येणाऱ्या रकमेचा आकडा पाहता हे त्यांचं मोठं नुकसान म्हटलं जात आहे.