मुंबई : अनेक नामवंत क्रिकेटपटू घडवणारे ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते रमाकांत आचरेकर यांच्यावर दादर स्मशानभूमीत अनेक दिग्गज क्रिकेटपटूंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, प्रवीण आमरे, चंद्रकांत पंडीत, अतुल रानडेसह अनेक माजी आणि युवा क्रिकेटपटू अंत्यसंस्काराला उपस्थित होते. तसंच, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, भाजप आमदार आशिष शेलार हेदेखील यावेळी उपस्थित होते. यावेळी भारतरत्न सचिन तेंडुलकर भावूक झाला आणि आपल्या सरांना अखेरचा निरोप देताना सचिनलादेखील अश्रू अनावर झाले. सचिननं यावेळी आपल्या लाडक्या सरांना खांदाही दिला.
दरम्यान, पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते रमाकांत आचरेकर सरांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार न झाल्यानं क्रिकेट विश्वातून आणि क्रिकेट चाहत्यांमधून नाराजी व्यक्त होतेय. यावर, भाजप नेते आणि राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया दिलीय. 'आचरेकर सरांच्या अंत्यसंस्काराला शासनाचे प्रतिनिधी म्हणून मंत्री उपस्थित होते... एमसीएचे अध्यक्ष म्हणून आशिष शेलारही उपस्थित होते... अंत्यसंस्कारात सर्व गोष्टी प्रोटोकॉलप्रमाणे झाल्या आहेत. आचरेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लवकरच क्रीडा विभाग आणि शासन काही अभिनव उपक्रम राज्यात सुरू करेल' असं विनोद तावडे यांनी म्हटलंय.
त्याअगोदर आज सकाळी, ज्या क्रिकेट महर्षीने गेली कित्येक दशके शिवाजी मार्क मैदानावर शेकडो क्रिकेटपटू घडवले, त्या आचरेकर सरांना शिवाजी पार्क मैदानात अनोखी मानवंदना देण्यात आली. आचरेकर सरांचे पार्थिव शिवाजी पार्क मैदानावर नेण्यात आले. त्यावेळी सरांच्या पार्थिवाला शिवाजी पार्कवर क्रिकेटचे धडे गिरवणाऱ्या युवा क्रिकेटपटूंनी रांगेत उभं राहून बॅट उंचावून मानवंदना दिली. आचरेकर सरांचं पार्थिव असलेल्या ट्रकसमोर दुतर्फा युवा क्रिकेटपटू बॅट हाती घेऊन उभे होते. सरांचे पार्थिव जात असताना या क्रिकेटपटूंनी हातातल्या बॅट उंचावून सरांना मानवंदना दिली. तर दुसरीकडे रमाकांत आचरेकर यांना सिडनी कसोटीत टीम इंडियाने श्रद्धांजली वाहिली. सिडनी कसोटीत दंडाला काळ्या फिती बांधून टीम इंडिया मैदानात उतरली.