ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदक जिंकत इतिहास रचणाऱ्या नेमबाज मनू भाकरचे प्रशिक्षक समरेश जंग यांना दिल्लीतील घर खाली करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. जमीन आणि विकास कार्यालयाने ही नोटीस बजावली असून, दोन दिवसांत घऱ रिकामी करण्यास सांगण्यात आलं आहे. ही जमीन संरक्षण मंत्रालयाच्या मालकीची आहे असंही नोटीशीत लिहिलं आहे. जंग राहत असलेल्या वस्तीला शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यालयाने बेकायदेशीर ठरवलं असून दोन दिवसात पाडलं जाणार आहे.
ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या मनू भाकेरचे प्रशिक्षक असलेले जंग यांनी एनडीटीव्हीला सांगितलं की, आपण गेल्या 75 वर्षांपासून या घरात वास्तव्यास असून काल भारतात परतल्यानंतर ते बेकायदेशीर असल्याचं समजलं. एक्सवरील पोस्टमध्ये जंग यांनी लिहिलं आहे की, "भारतीय नेमबाजांनी दोन ऑलिम्पिक पदके जिंकल्यानंतर, मी संघाचा प्रशिक्षक नुकताच ऑलिम्पिकमधून घरी परतलो आणि मला माझं घर आणि परिसर 2 दिवसांत पाडला जाणार असल्याची वाईट बातमी मिळाली आहे".
“मी काल संध्याकाळी 5 च्या सुमारास परतलो आणि, संध्याकाळी 6 च्या सुमारास, घर दोन दिवसांत पाडले जाणार आहे आणि आम्हाला ते रिकामं करायचं आहे अशी घोषणा करण्यात आली,” अशी माहिती त्यांनी दिली. दिल्लीतील सिव्हिल लाइन्समधील खैबर पास कॉलनीमध्ये रहिवासी आणि संरक्षण मंत्रालय यांच्यात कायदेशीर लढा आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने 9 जुलै रोजी हा परिसर संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत येत असल्याचा निर्णय दिला आहे.
समरेश जंग यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं आहे की, नेमका कोणता भाग पाडला जाणार आहे हे सांगण्यात आलेलं नाही. अनेक दशकांपासून राहत असलेल्या लोकांना घर रिकामं करण्यासाठी दिलेला वेळ खूपच कमी आहे. जंग म्हणाले, “कोणतीही योग्य माहिती किंवा नोटीस देण्यात आलेली नाही. 75 वर्षापासून येथे राहणारी कुटुंबे 2 दिवसात घऱं कशी रिकामी करणार? धक्कादायक म्हणजे, जमीन आणि विकास कार्यालयाने 2 दिवसांची नोटीस देऊन, नेमके कोणते क्षेत्र पाडले जाणार आहे याची कोणतीही स्पष्टता दिलेली नाही”.
आपल्याला सन्मानितपणे बाहेर पडण्याची परवानगी देण्यात यावी आणि योग्यरित्या जागा रिकामी करण्यासाठी दोन महिन्यांचा वेळ द्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं.