४.३० वाजता सुरु होणार भारत-दक्षिण आफ्रिका सामना, या खेळाडूंना संधी

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधल्या पहिल्या वनडे मॅचला ४.३० वाजता सुरुवात होणार आहे.

Updated: Feb 1, 2018, 03:55 PM IST
४.३० वाजता सुरु होणार भारत-दक्षिण आफ्रिका सामना, या खेळाडूंना संधी  title=

डरबन : भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधल्या पहिल्या वनडे मॅचला ४.३० वाजता सुरुवात होणार आहे. जोहान्सबर्गच्या शेवटच्या टेस्टमध्ये विजय मिळवल्यावर भारताचा आत्मविश्वास दुणावला असेल.

या मॅचमध्ये भारतीय टीममध्ये फारसे बदल अपेक्षित नाहीत. रोहित शर्मा आणि शिखर धवन ओपनिंगला येतील. यानंतर कॅप्टन विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर, धोनी बॅटिंगला येतील. मनिष पांडे, केदार जाधव आणि दिनेश कार्तिकपैकी कोणाला संधी मिळतेय हे पाहाणं औत्सुक्याचं असणार आहे.

बॉलरच्या यादीमध्ये भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराहवर जबाबदारी असेल. तर हार्दिक पांड्या ऑल राऊंडर म्हणून खेळेल. स्पिनर्समध्ये भारताला कुलदीप यादव, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल हे तीन पर्याय आहेत. 

दक्षिण आफ्रिकेला मात्र सीरिज सुरु व्हायच्या आधीच झटका लागला आहे. दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज बॅट्समन एबी डिव्हिलियर्स बोटाच्या दुखापतीमुळे पहिल्या तीन वनडेतून बाहेर झाला आहे. एबी ऐवजी मार्करमला संधी दिली जाऊ शकते. फास्ट बॉलर म्हणून आफ्रिकेकडे रबाडा, मॉर्कल, क्रिस मॉरिस, लुंगी नगिडी, अंदिले फेहुलकवायो हे पर्याय आहेत.

भारताचं लाजीरवाणं रेकॉर्ड

१९९२-९३ सालापासून भारत दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये ६ वनडे सीरिज खेळल्या आहेत. या सगळ्या वनडे सीरिजमध्ये भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. दक्षिण आफ्रिकेत खेळलेल्या २८ वनडेंपैकी २१ मॅचमध्ये भारताचा पराभव, ५ मॅचमध्ये विजय झाला तर २ मॅचचा कोणताही निकाल लागला नाही.

आत्तापर्यंत डरबनमध्ये भारत फक्त २ मॅच जिंकला आहे. या दोन्ही मॅच २००३ सालच्या क्रिकेट वर्ल्ड कपमधील आहेत. २००३ वर्ल्ड कपमध्ये डरबनमध्ये भारतानं इंग्लंड आणि केनियाला हरवलं आहे. तर दक्षिण आफ्रिका-भारतात डरबनमध्ये ७ वनडे झाल्या. यापैकी ६ मॅचमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला तर एका मॅचचा निकाल लागला नाही.