मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मंगळवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पहिला एकदिवसीय सामना पार पडला. यावेळी काही प्रेक्षकांनी नागरिकत्व सुधारणा विधेयक (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीविरोधात (NRC) निदर्शन केली. या आंदोलकांच्या टी-शर्टवर No NRC, No NPR, No CAA अशी अक्षरे छापली होती.
देशभरात सध्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मुद्द्यावरून वातावरण तापल्यामुळे आजच्या सामन्यासाठी विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र, टाटा सामाजिक संस्था (TISS), मुंबई विद्यापीठ आणि आयआयटीतील काही विद्यार्थी वेगवेगळी आद्याक्षरे असलेले टी-शर्ट घालून स्टेडियममध्ये पोहोचले. यावेळी विद्यार्थ्यांनी टी-शर्ट लपवण्यासाठी वरती वेगळे कपडे घातले होते.
पहिल्या वनडेत ऑस्ट्रेलियाकडून भारताचा दारुण पराभव
वानखेडे स्टेडियमच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर २० व्या षटकाचा खेळ होईपर्यंत विद्यार्थी शांत बसले. यानंतर त्यांनी विशिष्ट पद्धतीने उभे राहत टी-शर्टवरील संदेश दाखवला. यावेळी विद्यार्थी 'भारत माता की ' आणि 'वंदे मातरम'च्या घोषणा देत होते. मात्र, त्यांनी CAA किंवा NRCच्या समर्थनार्थ कोणत्याही घोषणा दिल्या नाहीत.
यानंतर मैदानातील सुरक्षारक्षकांनी हस्तक्षेप करत त्यांना टी-शर्ट काढण्यास सांगितले. याशिवाय, आजच्या सामन्यावेळी काळे कपडे घालून आलेल्या प्रेक्षकांनाही परत पाठवण्यात आल्याचे समजते. मात्र, या वृत्ताची खातरजमा झालेली नाही.
दरम्यान, आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा १० गडी राखून दारूण पराभव केला. भारताने ऑस्ट्रेलियापुढे अवघे २५६ धावांचे आव्हान ठेवले, ते ऑस्ट्रेलियाने ३७.४ षटकांतच पूर्ण केले. गेल्या १५ वर्षांतला हा भारताचा सर्वात लाजिरवाणा पराभव आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने १-० अशी आघाडी घेतली आहे.