Sport News : भालाफेकपटू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवून दिलं होतं. नीरजच्या भाल्याचा ई- लिलाव झाला, यामध्ये भाल्यासाठी दीड कोटी रूपयांची बोली लागली. हा भाला विकत घेणाऱ्याचं नाव समोर आलं आहे. बीसीसीआयने भाला 1.5 कोटींना विकत घेतला होता. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्मृतिचिन्हांच्या संग्रहाचा ई-लिलाव झाला तेव्हा चॅम्पियन नीरज चोप्राचा भाला बीसीसीआयने दीड कोटी रुपयांना विकत घेतला होता. बीसीसीआयने त्यावर बोली लावली होती.
टोकियो ऑलिम्पिकमधून परतल्यानंतर चोप्राने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यादरम्यान नीरजने त्यांना भाला भेट म्हणून दिला. या भाल्यासह अनेक गोष्टींचा ई-लिलाव करण्यात आला. यातून मिळणारा पैसा 'नमामि गंगे' प्रकल्पासाठी वापरला जाणार असल्याची माहिती आहे.
बीसीसीआयने नीरज चोप्राच्या भाल्यासह भारतीय पॅरालिम्पिक दलाच्या स्वाक्षरीसह एक कपडाही खरेदी केला. यासाठी बीसीसीआयने एक कोटी रुपये खर्च केले. यामध्ये चोप्राचा भाला ई-लिलावात सर्वात महाग विकला गेला होता.