#METOO: अभिनेत्री नंदिता दासच्या वडिलांवर आरोप

मीटू मोहिमेतून होणारे आरोप काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत.

Updated: Oct 17, 2018, 07:48 PM IST
#METOO: अभिनेत्री नंदिता दासच्या वडिलांवर आरोप title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री नंदिता दासचे वडिल आणि पद्मभूषण पुरस्कार विजेते जतिन दास यांच्यावर महिला कार्यकर्त्या निशा बोरा यांनी लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. जतिन यांनी त्यांच्या खिडकी या गावी असलेल्या स्टुडिओमध्ये २००४ साली माझ्यावर अत्याचार केल्याचा आरोप निशा बोरा यांनी केला आहे. जतिन यांनी निशा बोरा यांचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. तर यावर नंदिता दासनंही प्रतिक्रिया दिली आहे. वडिलांवर आरोप झाले असले तरी माझा मीटू मोहिमेला पाठिंबा आहे, असं नंदिता दास म्हणाली आहे.

कागद उत्पादन कंपनीच्या सहसंस्थापक निशा बोरा यांनी प्रसिद्ध चित्रकार जतिन दास यांच्यावर आरोप केले होते. मी जतिन यांना त्यांच्या गावी खडकीच्या स्टुडिओमध्ये भेटले होते. त्यांनी मला पकडण्याचा प्रयत्न केला. यानंतर घाबरून मी लांब झाले. त्यांनी पुन्हा माझ्यासोबत तसंच केलं. दुसऱ्यावेळी त्यांनी ओठांवर माझं चुंबन घेतलं. तुला चांगलं वाटेल, असंच काहीतरी ते म्हणाले होते. या घटनेनंतर मी तिकडून पळ काढला आणि घरी आले. याआधी मी यावर बोलले नव्हते पण आता बोलतेय, असं बोरा त्यांच्या ट्विटमध्ये म्हणाल्या.

या घटनेच्या २ दिवसानंतर जतिन दास यांची मुलगी नंदिता दास यांनी मला फोन केला. तुझ्यासारखी दुसरी महिला सहाय्यक शोधायला मदत करशील का, असं नंदितानं मला विचारलं. वडिलांनीच मला तुझा नंबर दिल्याचंही नंदितानं सांगितल्याचा दावा निशा बोरा यांनी केला आहे.

जतिन दास यांनी निशा बोरा यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. सध्या लोकांविरोधात आरोप करण्याचा खेळ सुरू झाला आहे. या सगळ्याचा उद्देश फक्त मजा घेणं एवढाच आहे. माझ्यावर लागलेले आरोप अश्लिल आहेत, असं जतिन दास म्हणाले. निशा बोराला आपण ओळखत नसल्याचंही जतिन यांनी सांगितलं. आपण शेकडो लोकांना भेटतो. त्यामुळे चेहरे लक्षात ठेवणं कठीण असतं. पण कुणी या पातळीला कसं जाऊ शकतं, असं वक्तव्य जतिन दास यांनी केलं.

वडिलांवर लागलेल्या आरोपांनंतर नंदिता दासनंही प्रतिक्रिया दिली आहे. मी मीटू आंदोलनाला पाठिंबा देते. वडिलांवर लागलेल्या आरोपानंतरही मी आवाज उठवीन. वडिलांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. ही वेळ महिला आणि पुरुषांनी खुलून बोलण्याची आणि सुरक्षित अनुभव देण्याची आहे. याचबरोबर आरोपांचा खरेपणाही महत्त्वाचा आहे. सत्याचा विजय व्हावा, अशी फेसबूक पोस्ट नंदिता दासनं केली आहे.