चांगल्या कामगिरीची परफेड मला डावलून; रहाणेच्या मनातील खंत अखेर उघड

रहाणेसा यापूर्वीही वनडे सामन्यातूनही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. दरम्यान यावरच आता रहाणेने मोठा खुलासा केला आहे.

Updated: Feb 11, 2022, 12:06 PM IST
चांगल्या कामगिरीची परफेड मला डावलून; रहाणेच्या मनातील खंत अखेर उघड title=

मुंबई : टीम इंडियातील मराठमोळा खेळाडू अजिंक्य रहाणेचा फॉर्म गेल्या काही काळापासून फार खराब दिसून येतोय. 2021 मध्ये रहाणेने 13 टेस्ट सामन्यात 20.83 च्या सरासरीने केवळ 479 रन्स केले. रहाणेचा असा खराब फॉर्म पाहता त्याला टेस्टच्या उपकर्णधारपदावरून काढून टाकलं. यापूर्वी त्याला वनडे सामन्यातूनही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. दरम्यान यावरच आता रहाणेने मोठा खुलासा केला आहे.

बॅकस्टेज विथ बोरिया या कार्यक्रमात बोलताना अजिंक्य रहाणे म्हणाला, "तुम्ही खेळाचा कितीही अभ्यास केलात तरी आत्मविश्वास वाढणार नाही. तो वाढण्यासाठी गेम टाईट आणि खेळात चांगले रन्स करावे लागतात. मी केवळ टेस्ट सामने खेळतो आणि गेल्या 2-3 वर्षात मी रणजीचे सामनेही खेळलो नाही. त्यामुळे मला असं वाटतं की, या गोष्टींही लक्षात घेतल्या पाहिजेत."

रहाणे पुढे म्हणाला, त्यापूर्वी मी वनडेसाठीही सतत खेळत होतो. त्यावेळी मी चांगला खेळंही केला होता. मात्र अचानक मी वनडेमधून ड्रॉप झालो. मला भूतकाळ उकरायचा नाही, मात्र मी 2014, 15, 16 आणि 17 मध्ये वनडे तसंच टेस्ट असं दोघांमध्येही चांगली कामगिरी करत होतो."

टीम इंडिया 2020-21 या दरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली होती. या दौऱ्यातील कसोटी मालिकेतील एडिलेड सामन्यात टीम इंडियाने लाज घालवली होती. अवघ्या 36 धावांवर कांगारुंनी टीम इंडियाचा खुर्दा उडवला होता. मात्र यानंतर रहाणेने आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला ऐतिहासिक मालिका विजय मिळवून दिला होता.  

"या मालिकेत मी अनेक निर्णय घेतले. या निर्णयाचं श्रेय हे दुसऱ्या कोणाला तरी देण्यात आलं", असं रहाणे म्हणाला. रहाणेने हा आरोप करत असताना त्याने कोणाचं नावं घेतलं नाही. मात्र रहाणेचा रोख हा विराटकडे असल्याचं म्हटलं जात आहे. कारण रहाणेच्या  नेतृत्वात मालिका विजय मिळवूनही त्याचं श्रेय विराटला मिळालं होतं.