पांड्याच्या जलद चौकशीसाठी विनंती नाही, मुंबईचं स्पष्टीकरण

'कॉफी विथ करण' या शोमध्ये भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांनी वादग्रस्त वक्तव्य केली.

Updated: Jan 21, 2019, 02:06 PM IST
पांड्याच्या जलद चौकशीसाठी विनंती नाही, मुंबईचं स्पष्टीकरण title=

मुंबई : 'कॉफी विथ करण' या शोमध्ये भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांनी वादग्रस्त वक्तव्य केली. त्यामुळे बीसीसीआयनं या दोघांवर निलंबनाची कारवाई केली. याप्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत दोन्ही क्रिकेटपटू कोणत्याच प्रकारचं क्रिकेट खेळू शकणार नाहीत. या दोघांच्या चौकशीला उशीर झाला आणि त्यानंतर शिक्षेचा निर्णय झाला, तर दोघांना आयपीएलला मुकावं लागू शकतं. त्यामुळे आयपीएलमधल्या मुंबईच्या टीमनं ही चौकशी जलद करावी अशी मागणी बीसीसीआयला केल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. हार्दिक पांड्या हा मुंबईचा महत्त्वाचा खेळाडू आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे सीईओ सुंदर रमण यांनी मात्र अशाप्रकारे कोणतीही मागणी केली नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांची चौकशी लांबली आणि त्यानंतर दोघांना शिक्षा सुनावण्यात आली तर फक्त आयपीएलच नाही तर जूनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपलाही या दोन्ही खेळाडूंना मुकावं लागू शकतं. आयपीएलमध्ये हार्दिक पांड्या मुंबईकडून तर केएल राहुल पंजाबकडून खेळतो. ऑस्ट्रेलियाप्रमाणेच न्यूझीलंड दौऱ्यातल्या वनडे आणि टी-२० सीरिजसाठीही हार्दिक आणि राहुलची निवड झाली होती. पण निलंबनामुळे या दोघांऐवजी विजय शंकर आणि शुभमन गिल यांना संधी मिळाली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या मॅचमधून विजय शंकरनं वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे हार्दिक पांड्या आणि केएल राहुलला ऑस्ट्रेलियाचा दौरा अर्धवट सोडून यावं लागलं होतं. या दोन्ही खेळाडूंना बीसीसीआयनं कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटीसला उत्तर देताना दोन्ही खेळाडूंनी बिनशर्त माफी मागितली होती.

या दोन्ही खेळाडूंच्या चौकशीसाठी लोकपालची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीनं सर्वोच्च न्यायालयात केली. पण ऍमिकस क्युरी म्हणून (न्यायमित्र) पीएस नरसिम्हा जेव्हा पद सांभाळतील तेव्हाच याप्रकरणाची सुनावणी करु असं, सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं सांगितलं.

सर्वोच्च न्यायालयानं स्वत: या प्रकरणासाठी लोकपालची नियुक्ती करावी कारण या दोन्ही प्रतिभावान क्रिकेटपटूंची कारकिर्द पणाला लागली आहे, असा युक्तीवाद बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे वकिल पराग त्रिपाठी यांनी केला. पण सर्वोच्च न्यायालयानं बीसीसीआयच्या सगळ्या प्रकरणाची सुनावणी एक आठवड्यापर्यंत स्थगित केली.

नरसिम्हा ऍमिकस क्युरी म्हणून जेव्हा पद सांभाळतील तेव्हाच लोकपालच्या नियुक्तीबाबत निर्णय होऊ शकतो. ऍमिकस क्युरीच्या पदावर आल्यानंतर जर पीएस नरसिम्हा यांना याप्रकरणाची सुनावणी लवकर होण्यासाठी आणि खेळाडूंच्या क्रिकेट खेळण्याला लवकर सुरुवात व्हावी, यासाठी लोकपालची गरज असल्याचं वाटलं, तरच लोकपालची नियुक्ती होईल, असं बीसीसीआयचा अधिकारी पीटीआयशी बोलताना म्हणाला.

'कॉफी विथ करण'मध्ये काय म्हणाले पांड्या-राहुल?