मुंबई : ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू इयान चॅपल यांनी महेंद्र सिंह धोनीचे कौतुक केले आहे. धोनी हा एकदिवसीय सामन्यातील सर्वश्रेष्ठ फिनिशर असल्याचे इयान चॅपल म्हणाले. धोनीचे कौतुक करताना चॅपल यांनी कर्णधार विराट कोहलीचे देखील कौतुक केले. ते म्हणाले की, कोहलीची कामगिरी पाहता तो सचिन तेंडुलकरचे देखील विक्रम मोडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
धोनीच्या जबाबदारीपूर्वक तसेच जास्त वेळ मैदानात तग धरून खेळण्याच्या त्याच्या खेळाडूवृत्तीबद्दल इयान चॅपल यांनी धोनीची प्रशंसा केली. इयान चॅपल यांनी वेबसाईट्च्या एका सदरामध्ये याबाबतीत लिहिले आहे की, "आपला संघ पेचात असताना संघाला विजय मिळवून देण्याबाबतचा धोनीसारखा समजदारपणा कोणत्याच खेळाडूकडे नाही. मी अनेकदा विचार केला की धोनीने फार उशीराने फटका लगावला, पण त्यानंतर धोनीने दोन धमाकेदार फटके मारत भारताला विजय मिळवून दिला." चॅपल म्हणाले की, धोनी जेवढा शांत स्वभावाचा आहे. तो स्वत:ला परिस्थितीनुसार बदलतो, याबद्दल कोणालाही शंका घेण्यास वाव नाही. हे त्याच्या खेळीमधून दिसून येते.
धोनीने मेलबर्नवरील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात केदार जाधवच्या जोडीने नाबाद ८७ धावा करत भारताला विजय मिळवून देण्यात महत्वपूर्ण योगदान दिले. तसेच ही खेळी करुन टीकाकारांना ही प्रत्युतर दिले. भारताने मेलबर्नमधील सामन्यात ७ विकेट्सने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत पहिल्यांदा द्विसंघ मालिका जिंकली. या मेलबर्नवरील विजयात धोनीच्या ८७ धावांचा महत्वाचे योगदान होते. धोनी आणि केदार जाधव यांच्यात चौथ्या विकेटसाठी नाबाद १२१ धावांची भागीदारी झाली होती. धोनीने या तीन एकदिवसीय मालिकेच्या तिन्ही सामन्यात अर्धशतकी कामगिरी केल्याने त्याला मालिकावीर निवडले गेले.
क्रिकेटविश्वात ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मायकल बेवन याचे नाव आदराने घेतले जाते. इयान चॅपल यांनी मायकल बेवनसोबत धोनीची तुलना केली. तुलना करताना ते म्हणाले की, ' ऑस्ट्रेलियाच्या सहाव्या क्रमांकावर खेळणाऱ्या माजी खेळाडूला धोनीने मागे टाकले आहे. मायकल बेवन हा खेळीचा शेवट चौकाराने करायचा. पण धोनी षटकाराने करतो. खेळपट्टीवर वेगात धावा काढण्याच्या बाबतीत मायकल बेवन आघाडीवर होता. पण ३७ व्या वर्षात देखील वेगवान पद्धतीने धावा काढणाऱ्यांच्या यादीत धोनीदेखील आहे.'
चॅपल म्हणाले की, बॅटमध्ये बदल करण्याच्या परवानगीमुळे तसेच टी-२० सामने खेळल्याने वैयक्तिक धावसंख्येच्या बाबतीत धोनी बेवनपेक्षा उत्तम आहे. धोनी हा उत्तम फिनिशर आहे, या बद्दल कोणाचेही दुमत नसेल. ऑस्ट्रेलिया विरोधातील पाच एकदिवसीय सामन्यातील सिडनीत झालेल्या पहिल्या सामन्यात धोनीच्या संथ खेळीवरुन प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. या खेळीमुळे धोनीने आता निवृत्त होण्याची वेळ आली आहे, इथपर्यंत क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चा रंगू लागल्या होत्या. तसेच धोनीच्या संथखेळीबद्दल भारताचा माजी गोलंदाज अजित आगरकर यांने देखील प्रश्न उपस्थित केले होते.
सर्वोत्कृष्ठ फलंदाजाच्या रुपात विराट कोहली हा महान विवियन रिचर्डसन, सचिन तेंडुलकर आणि एबी डिविलियर्स यासारख्या यशस्वी फलंदाजाना मागे टाकून तो आपल्या एकदिवसीय क्रिकेट प्रकाराचा शेवट सर डॉन ब्रॅडमॅन यांच्यासारखा करेल, असे इयान चॅपल यांनी आपल्या सदरात लिहिले आहे. त्या सदरात चॅपल यांनी उल्लेख केला की, कोहलीच्या एकदिवसीय सामन्यातील खेळ पाहून मला विवियन रिचर्डसन आठवतात. कोहली अशाच प्रकारे खेळत राहिला तर तो सचिनच्या शतकांचा विक्रमच मोडणार नाही तर त्यापेक्षा अधिक २० शतक करेल. विराट सचिनच्या विक्रमाजवळ जरी पोहचला तरी ही त्याच्यासाठी मोठी बाब असेल, असे इयान चॅपल यांनी लिहिले.
अधिक वाचा : सचिन तेंडुलकरने केलं धोनीचं कौतुक