टीम इंडियाला जीवे मारण्याची धमकी, मुंबई एटीएसची एकाला अटक

टीम इंडियाच्या खेळाडूंना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एकाला मुंबई एटीएसने अटक केली आहे.

Updated: Aug 22, 2019, 08:45 PM IST
टीम इंडियाला जीवे मारण्याची धमकी, मुंबई एटीएसची एकाला अटक title=

मुंबई : टीम इंडियाच्या खेळाडूंना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एकाला मुंबई एटीएसने अटक केली आहे. मुंबई एटीएसच्या पथकाने आसाममध्ये जाऊन या व्यक्तीला ताब्यात घेतलं. ब्रजमोहन दास असं या व्यक्तीचं नाव आहे. ब्रजमोहन दासने टीम इंडियाच्या खेळाडूंना जीवे मारण्याच्या धमकीचा मेल बीसीसीआयला पाठवला होता. यानंतर मुंबई एटीएसने कारवाईला सुरुवात केली. आसामच्या शांतीपूरमधल्या मोरीगाव जिल्ह्यात एटीएसचं पथक पोहोचलं आणि आसाम पोलिसांच्या मदतीने ब्रजमोहन दासला पकडण्यात आलं.

१६ ऑगस्टला बीसीसीआयला टीम इंडियाला धमकी देणारा हा मेल आला होता. यानंतर २० ऑगस्टला मुंबई एटीएसने आसाम पोलिसांच्या मदतीने ब्रजमोहन दासला त्याच्या घरातून ताब्यात घेतलं. यानंतर त्याला मोरीगावच्या न्यायालयात हजर करण्यात आलं आणि त्याची ट्रान्सिट रिमांड घेण्यात आली. यानंतर ब्रजमोहनला मुंबईत आणण्यात आलं. मुंबईच्या माझगाव न्यायालयात ब्रजमोहनला हजर करण्यात आलं, तेव्हा त्याला २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.

भारतीय टीम ही सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. वनडे आणि टी-२० सीरिजमध्ये भारताचा दणदणीत विजय झाला. यानंतर आता २ टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरुवात झाली आहे.