मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पुण्यातल्या तिसऱ्या वनडे आधी बीसीसीआयनं ऑस्ट्रेलिया दौरा आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा केली. टी-२० च्या टीममध्ये धोनीचं नाव नसल्यामुळे अनेकांना धक्का बसला. वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी धोनीला वगळण्यात आलं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजची मात्र अजूनही घोषणा झालेली नाही.
धोनीला वगळल्यामुळे त्याचे फॅन नाराज झाले. तसंच धोनीची टी-२० कारकिर्द आता संपली आहे, अशा चर्चाही सुरु झाल्या आहेत. पण भारतीय टीमचे निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी मात्र धोनीला आराम दिला असल्याचं सांगितलं.
प्रसाद यांनी असं सांगितलं असलं तरी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांचं मत मात्र वेगळं आहे. ऑस्ट्रेलियात २०२० साली टी-२० वर्ल्ड कप होणार आहे. तेव्हापर्यंत धोनी क्रिकेट खेळणार नाही, मग टी-२० क्रिकेट टीममध्ये त्याची निवड करण्याचं कारण काय, असा सवाल बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं विचारला आहे.
निवड समिती सदस्य आणि टीम व्यवस्थापन यांनी याबद्दल बरीच चर्चा केली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा निवड समितीच्या बैठकीला उपस्थित होते. या दोघांच्या परवानगीशिवाय निवड समितीचे सदस्य धोनीला वगळण्याचा निर्णय घेतील, असं वाटतं का, असंही बीसीसीआयचा अधिकारी म्हणाला.