मुंबई : आयपीएलच्या अकराव्या मोसमाला दिमाखात सुरुवात झाली आहे. पहिल्याच मॅचमध्ये चेन्नई सुपरकिंग्जनं मुंबई इंडियन्सवर रोमहर्षक विजय मिळवला. शेवटच्या बॉलवर एक विकेट राखून चेन्नईनं मुंबईला पराभूत केलं. चेन्नईच्या या विजयाचे शिल्पकार ठरले ते ड्वॅन ब्राव्हो आणि केदार जाधव. ब्राव्होनं ३० बॉल्समध्ये ६८ रन्सची खेळी केली तर केदार जाधवनं २२ बॉल्समध्ये २४ रन्स केले.
कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल ही काही अशी नावे आहेत जे सध्या क्रिकेटचे स्टार बनले आहेत. भारतीय क्रिकेट टीमच्या या युवा स्टार्समध्ये आणखी एक नाव येऊ शकतं ज्याने शनिवारी आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात जबरदस्त कामगिरी केली.
आयपीएल २०१८ च्या पहिल्या सामन्यात पहिल्यांदाच बॉलिंग करणाऱ्या मुंबई इंडियंसच्या या २० वर्षीय स्पिनरने अनेकांचं लक्ष वेधलं. पहिल्याच सामन्यात अशी कामगिरी केल्यामुळे आगामी काळात तो आणखी चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा वाढली आहे.
मुंबई इंडियन्सचा लेग स्पिनर मयंक मार्कंडेय यांने त्याच्या फिरकीच्या जोरावर महत्त्वाच्या विकेट घेतल्या. पहिल्याच सामन्यामध्ये रोहित शर्माने त्याला मैदानात उतरवलं. मयंकने देखील रोहितला नाराज केलं नाही चेन्नई सारख्या दिग्गज टीमच्या समोर मयंकने चांगली बॉलिंग करत ४ ओव्हरमध्ये ३ विकेट घेत २३ रन दिले. ओपनर अंबाती रायडू, महेंद्र सिंग धोनी, दीपक चाहरच्या विकेट त्याने घेतल्या. मयांक मार्कंडेयचा गुगली धोनीलाही भारी पडला आणि यामध्ये धोनी त्याची विकेट गमावून बसला.
मयंकचा जन्म ११ नोव्हेंबर १९९७ ला पंजाबच्या भटिंडामध्ये झाला. पंजाब अंडर-१९, भारतीय अंडर-१९ नंतर त्याने आयपीएलमध्ये स्थान मिळवलं. मयंकने याच वर्षी जानेवारीमध्ये पंजाबकडून सैयद मुश्ताक ट्रॉफीमध्ये टी20 डेब्यू केलं होतं. मयंकची बेस प्राइज २० लाख रुपये होती. मुंबईने पहिला सामना हरला असला तरी या नव्या खेळाडूचा प्रवास आता सुरु झाला आहे.