मुंबई : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या जागी आता अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला टीम इंडियाच्या टी20 स्क्वॉडमध्ये स्थान देण्यात आलं आहे. मोहम्मद शमी ऐवजी बीसीसीआयकडे मोहम्मद सिराज व इतर अनेक पर्याय होते.मात्र तरीही मोहम्मद शमीची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात तो एकही टी20 सामना खेळला नाही आहे, तरीही त्याची संघात निवड झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. मात्र मोहम्मद शमीला संघात स्थान देण्यामागे ही चार प्रमुख कारणे आहेत. ही कारणे काय आहेत ती जाणून घेऊयात.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) T20 वर्ल्ड कपसाठी जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद शमीची निवड केली आहे. निवडकर्त्यांनी अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा वर्ल्ड कपच्या 15 सदस्यीय संघात समावेश केला आहे.यासाठी शमीही ब्रिस्बेनला पोहोचला आहे, जिथे तो आता टीम इंडियाच्या इतर सदस्यांमध्ये सामील होणार आहे.
मोहम्मद शमी जवळपास वर्षभर टी-20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियासाठी एकही सामना खेळला नाही. त्याचा शेवटचा सामना गेल्या वर्षी यूएईमध्ये झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळला होता. असे असूनही शमीच्या यशाची काही कारणे आहेत, ज्यामुळे त्याची निवड योग्य असल्याचे सिद्ध होऊ शकते.
मोहम्मद शमीला ऑस्ट्रेलियात खेळण्याचा अनुभव आहे. या वेगवान गोलंदाजाने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर 396.5 ओव्हर्स टाकली आहेत. शमीला तिथली खेळपट्टी कळणार हे स्पष्ट आहे. शमीला बाऊन्स कुठे आहे याची माहिती असेल आणि त्याला त्याची लाइन-लेंथ सेट करण्यात फारशी अडचण येणार नाही.
मोहम्मद शमी या वर्षी भलेही एकही टी-20 आंतरराष्ट्रीय खेळला नसेल, परंतु हा खेळाडू टी-20 क्रिकेटमध्ये मोठा विकेट घेणारा खेळाडू असल्याचे सिद्ध झाले आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने गुजरात टायटन्ससाठी 16 सामन्यात 20 विकेट घेतल्या. गेल्या मोसमातही शमीने 14 सामन्यांत 19 विकेट घेतल्या होत्या.
शमीला नवीन चेंडू कसा वापरायचा हे माहित आहे. त्याची सीम आणि रिस्ट पोसिशन जगातील सर्वोत्तम मानली जाते. ऑस्ट्रेलियाच्या उसळत्या खेळपट्टीवर त्याची मोठी मदत होऊ शकते. शमीला स्विंगसह अतिरिक्त बाउंस मिळू शकतो, जो कोणत्याही फलंदाजाला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवू शकतो.
मोहम्मद शमीने 2015 मध्ये ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या वर्ल्ड कपमध्ये अप्रतिम कामगिरी केली. त्याला 7 सामन्यात 17 विकेट घेण्यात यश आले. वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर होता.टी-20 क्रिकेटमध्ये तो पॉवरप्लेमध्ये अधिक धोकादायक ठरू शकतो.
ही काही महत्वपुर्ण कारणे आहेत, जी मोहम्मद शमीची निवड योग्य ठरवते आहे. आता टी 20 वर्ल्ड कपमध्ये तो कशी कामगिरी करतो, हे येणाऱ्या काळात कळणार आहे.