नवी दिल्ली : टीम इंडियाचा फास्ट बॉलर मोहम्मद शमी पत्नीसोबत सुरु असलेल्या वादामुळे अडचणीत आला. पत्नीनं केलेल्या आरोपांमुळे मोहम्मद शमी चांगलाच अडचणीत सापडला होता. बीसीसीआयने त्याचा करारही रद्द केला होता. मात्र, नंतर बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकानं केलेल्या चौकशीत शमीला क्लिन चीट मिळाली.
बीसीसीआयनं अखेर मोहम्मद शमीसोबतच्या कराराचं नुतनीकरण केलं आहे. मोहम्मद शमीचा बीसीसीआयनं बी ग्रेडमध्ये समावेश केला आहे. क्लिन चीटमुळे मोहम्मद शमीला मोठा दिलासा मिळाला आहे. यासोबतच आयपीएलमध्ये पुनरागमन करण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.
आयपीएलच्या तयारीसाठी मोहम्मद शमी देहरादूनमध्ये दाखल झाला आहे. याच ठिकाणी मोहम्मद शमी आपल्या बॉलिंगची प्रॅक्टिस करत आहे. नुकत्याच झालेल्या वादामुळे शमी खूपच तणावात होता. त्यानंतर आता देहरादूनमध्ये शमी क्रिकेट अकादमीत बॉलिंग प्रॅक्टिस करत आहे. यासोबतच शमी टेनिसही खेळताना पहायला मिळाला.
मोहम्मद शमीने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. शमी यंदाच्या आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेविल्सच्या टीमकडून खेळणार आहे. एक दिवसआधी शमीने म्हटलं होतं की, बीसीसीआयवर माझा पूर्ण विश्वास होता तसेच मी खरं बोलत असल्याने या प्रकरणातुन बाहेर पडणार असंही म्हटलं होतं. शमीने म्हटलं की, आपला राग तो मैदानात व्यक्त करणार आहे.
मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहांनं मोहम्मद शमीवर मारपीट, बलात्कार, हत्येचा प्रयत्न, घरगुती हिंसाचार आणि मॅच फिक्सिंगसारखे गंभीर आरोप केले आहेत. मोहम्मद शमीच्या पत्नीनं त्याच्याविरोधात केसही दाखल केली आहे. यातल्या मॅच फिक्सिंगच्या आरोपानंतर बीसीसीआयनं शमीच्या चौकशीला सुरुवात केली होती. मात्र, बीसीसीआयने शमीला क्लिन चीट दिली आहे.