Mohammed Shami Blasts Inzamam ul Haq: भारताच्या सर्वात भेदक गोलंदाजांपैकी एक असलेल्या मोहम्मद शमीचं (Mohammed Shami) बोलणंही तितकंच भेदक आणि थेट असल्याचं नुकत्याच त्याने दिलेल्या एका मुलाखतीमधून स्पष्ट झालं आहे. शमीने एका मुलाखतीमध्ये पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकच्या (Inzamam ul Haq) विधानांना थेट कार्टूनगिरी असं म्हटलं आहे. नुकत्याच पार पडलेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने बॉल कुरतडून रिव्हर्स स्वींग केल्याचा दावा इंझमाम-उल-हकने केला होता. याच दाव्यासंदर्भात बोलताना शमीने इंझमाम-उल-हकला झापलं आहे. 54 वर्षीय इंझमाम-उल-हकने भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान झालेल्या सामन्यात भारताने बॉल टॅम्परिंगची मदत घेत सामना जिंकल्याचा गंभीर आरोप केला होता. सामन्यातील 14 व्या 15 व्या ओव्हरमध्ये अर्शदीप सिंगसहीत इतर गोलंदाजांचे चेंडू रिव्हर्स स्वींग होत असल्याच्या मुद्द्यावरुन इंझमाम-उल-हकने ही टीका केलेली.
इंझमाम-उल-हकने ज्या सामन्याच्या संदर्भातून टीका केली त्या सुपर 8 च्या सामन्यामध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला 24 धावांनी पराभूत केलं. या सामन्यात रोहितने 40 बॉलमध्ये 92 धावा केल्या होत्या. भारताने या सामन्यात 200 हून अधिक धावा केल्या. मात्र अर्शदीपने तीन विकेट्स घेतल्याने ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला आणि भारताने सामना जिंकत स्पर्धेतील आपली अजिंक्य वाटचाल सुरु ठेवली. नोव्हेंबरमध्ये पार पडलेल्या एकदिवसीय वर्ल्ड कपमध्येही इंझमामने शमी डिजीटल बॉल वापरतो आणि यंत्राच्या मदतीने चेंडू वळवतो असा विचित्र दावा केला होता.
शुभांकर मिश्रा या युट्यूबरच्या 'अनप्लग्ड' या कार्यक्रमातील मुलाखतीमध्ये शमीला इंझमाम-उल-हकने केलेल्या बॉल टॅम्परींगच्या आरोपासंदर्भात विचारण्यात आलं. इंझमाम-उल-हकने 2023 च्या एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपमध्येही शमीने डिजीटल बॉलचा वापर करुन चेंडू वळवल्याचा आरोप इंझमाम-उल-हकने केलेला. यावर उत्तर देताना शमीने, "ते (पाकिस्तानी) आपल्याबद्दल कधीच समाधानी नसतात आणि यापुढेही नसतील. मला वर्ल्ड कपमध्ये वेगळा बॉल देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. मी एका मुलाखतीमध्येही हे सांगितलं की मी तो बॉल घरी ठेवला आहे. माझ्याकडे प्लेअर ऑफ द मॅचसाठी दिलेला बॉल आहे. कदाचित एखाद्या दिवशी मी तो बॉल कापून त्यामध्ये मशीन आहे की नाही ते दाखवेन," अशी उपहासात्मक प्रतिक्रिया नोंदवली.
नक्की वाचा >> 'हिंमत असेल तर..', सानियाबरोबरच्या लग्नासंदर्भातील प्रश्नावर मोहम्मद शमी भडकला; म्हणाला, 'कोणाच्या तरी..'
"आता त्यांनी अर्शदीप सिंगने चेंडू कसा वळवला यासंदर्भात रंजक प्रतिक्रिया नोंदवली आहे. खरं तर त्यांच्याविरुद्ध जो खेळाडू चांगली कामगिरी करतो त्याला ते लक्ष्य करतात," असं शमी म्हणाला. एवढ्यावरच न थांबता शमीने, "या असल्या कार्टूनगिरीच्या प्रतिक्रिया इतर कुठे तरी द्याव्यात. ते लोकांना वेड्यात काढण्याचा प्रयत्न करत आहेत," अशा शब्दांमध्ये शमीने इंझमाम-उल-हकची लाजच काढल्याचं पाहायला मिळालं. शमीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तसेच यंत्राच्या मदतीने चेंडू वळवतो या इंझमामच्या दाव्याची खिल्ली उडवताना शमीने मी बॉल टाकताना वेगळं बटण दाबलं गेलं आणि इन स्वींगचा आऊट स्वींग झाला तर चेंडू चौकार किंवा षटकार नक्कीच जाईल, असं हसत म्हटलं.
नक्की वाचा >> 'मी अजून काय करणं अपेक्षित आहे? मी कधीच...', कोहलीवर भडकला मोहम्मद शमी; म्हणाला, 'तुम्ही मला..'
तुम्हीच पाहा या मुलाखतीमधील शमीच्या प्रतियेचा हा व्हायरल व्हिडीओ...
Shami bhai roasted Pakistan pic.twitter.com/yqiuIqdhoA
— Johns (@JohnyBravo183) July 19, 2024
टी-20 वर्ल्ड कप जिंकवून देणारा भारतीय कर्णधार रोहित शर्माला इंझमाम-उल-हकने केलेल्या बॉल टॅम्परिंगच्या आरोपाबद्दल विचारण्यात आलं असता त्याने, पाकिस्तानी क्रिकेटशी संबंधित व्यक्तींनी उघड्या डोळ्यांनी आणि बुद्धीने गोष्टींकडे पहावं, असा खोचक सल्ला दिलेला. आता शमीनेही याच मुद्द्यावरुन इंझमाम-उल-हकला झापलं आहे.