'तू जे काही करायचा प्रयत्न करत आहेस ना...,' पत्रकाराने प्लेईंग 11 संबंधी विचारलेल्या प्रश्नावर मोहम्मद शमी स्पष्टच बोलला

ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या एकदिवीसय सामन्यात मोहम्मद शमीने 5 विकेट्स घेण्याचा विक्रम केला. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मोहम्मद शमीने अनेक प्रश्नांवर स्पष्ट उत्तरं दिली.  

शिवराज यादव | Updated: Sep 23, 2023, 06:49 PM IST
'तू जे काही करायचा प्रयत्न करत आहेस ना...,' पत्रकाराने प्लेईंग 11 संबंधी विचारलेल्या प्रश्नावर मोहम्मद शमी स्पष्टच बोलला title=

भारतीय क्रिकेट संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी याला संघात नेहमीच स्थान मिळतं. पण गेल्या काही सामन्यांपासून त्याला फक्त एकदिवसीय सामन्यातच जागा मिळत असल्याचं दिसत आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाविरोधातील सामन्यात संधी मिळाली असता मोहम्मद शमीने पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीची कमाल दाखवली. मोहम्मद शमीने 5 विकेट्स मिळवत आपण संघासाठी इतके महत्त्वाचे खेळाडू का आहोत हे सिद्ध केलं आहे. दरम्यान जेव्हा संघातून वगळलं जातं तेव्हा तो क्षण कोणत्याही खेळाडूसाठी दुखावणारा असतो. यावर बोलताना मोहम्मद शमीने जेव्हा आपल्याला संघातील 11 खेळाडूंमध्ये स्थान मिळत होतं तेव्हा काही खेळाडूंना बाहेर बसावं लागत होतं असं स्पष्टच सांगितलं. 

ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या सामन्यात 5 गडी राखून विजय मिळवल्यानंतर मोहम्मद शमीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. "जेव्हा मी नियमितपणे क्रिकेट खेळत होतो तेव्हा कोणीतरी असेलच ज्यांना बाहेर बसावं लागत होतं. त्याबद्दल मला वाईटही वाटत नव्हतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही बाहेर बसलेला असता तेव्हा वाईट वाटण्याचं कारण नाही. कारण त्यावेळी संघ जिंकत असतो," असं मोहम्मद शमीने सांगितलं. 

भारतीय क्रिकेट व्यवस्थापनाने सांगितलं आहे की, वर्ल्डकपदरम्यान जेव्हा भारतीय संघ पूर्ण ताकदीने मैदानात उतरेल तेव्हा जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज हे मुख्य गोलंदाज असतील. दरम्यान मोहम्मद शमीने ऑस्ट्रेलियाविरोधात 5 विकेट्स घेतल्यानंतर तुम्ही आळीपाळीने खेळता तेव्हा ते फार काही वाईट नसतं असं सांगितलं आहे.

"हा टीमचा प्लान आहे आणि त्याच्यावर कायम राहणं महत्त्वाचं आहे. तुम्ही नेहमीच प्लेईंग 11 मध्ये असू शकत नाही. अनेकदा गोष्टी या टीम कॉम्बिनेशनवर अवलंबून असतात," असं मोहम्मद शमीने म्हटलं आहे.

"जर तुम्ही चांगले खेळत असाल आणि त्यानंतरही प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळत नसेल तर जे खेळत आहेत त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. मला वाटत नाही की यात वाईट वाटण्याचं काही कारण आहे. संघ मला जी काही जबाबदारी देईल ती पार पाडण्यास मी तयार आहे," असं मोहम्मद शमीने स्पष्ट केलं. 

रोटेशन पॉलिसीला मान्यता दिल्यास तू कुठे असशील  असा प्रश्नही त्याला विचारण्यात आला होता. त्यावर तो म्हणाला की, "तुम्ही जे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहात ते माझ्या आकलनाच्या पलीकडचे आहे. पण जेव्हा तुम्ही संघ तयार करता तेव्हा खेळाडूंना आळीपाळीने संधी देण्याची जबाबदारी प्रशिक्षकाची असते आणि परिस्थितीनुसार ते ठरवले जाते".

वर्ल्डकपच्या आधी रोटेशनवर खेळणं चांगली बाब असल्याचं मोहम्मद शमी म्हणाला आहे. "आम्हाला रोटेशनमुळे चांगले परिणाम मिळाले आहेत आणि मला वाटतं वर्ल्डकपच्या आधी एकामागोमाग एक सामने खेळत जास्त भार टाकू नये. सध्या चांगली कामगिरी सुरु असून, आम्हाला चांगले परिणाम मिळत आहेत," असं मोहम्मद शमी म्हणाला. मोहम्मद शमीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर ब्रेक घेतला होता. तसंच दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांसाठी तो वेस्ट इंडिजला गेला नव्हता. ब्रेक घेणं महत्त्वाचं होतं, कारण मी सलग 7 ते 8 महिने खेळत होतो. मला कुठेतरी विश्रांतीची गरज भासत होती असं मोहम्मद शमीने म्हटलं.