मुंबई : भारतीय क्रिकेट चाहत्यांना आज एक मोठा धक्का बसला. महिला टीम इंडियाची कर्णधार मिताली राजने निवृत्ती घोषणा केली. ट्विटरवरून माहिती देत इंटरनॅशनल क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमधून निवृत्त होत असल्याची पोस्ट तिने शेअर केलीये. मात्र महिला क्रिकेटला उंच शिखरावर नेणाऱ्या मितालीचं पहिलं प्रेम हे क्रिकेट नव्हतं, याबद्दल तुम्हाला कल्पना आहे का?
महिला क्रिकेट खेळाडू म्हणून जगभरात मिताली राजच्या नावाचीच चर्चा आहे. तिच्या नावे अनेक विक्रमांचीही नोंद आहे. भारतीय महिला क्रिकेटमधील सचिन तेंडुलकर, अशी उपमा तिला दिली जाते. क्रिकेट रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या याच मितालीच्या खासगी आयुष्याबद्दल एक मोठी गोष्ट आहे.
क्रिकेटच्या विश्वात नाव उंचावणाऱ्या मितालीनं तिची अशी वेगळी ओळख प्रस्थापित केली. पण, हा खेळ तिचं पहिलं प्रेम नव्हता. वडिलांच्या आग्रहापोटी 'ती' या खेळात आली होती. तिला मुळात नृत्य करण्याची फारच आवड होती. लहानपणापासूनच एक डान्सर होण्याची तिची इच्छा होती.
भरतनाट्यमचं प्रशिक्षण घेणारी मिताली नृत्यकलेत नव्हे तर क्रीडा क्षेत्रात पुढे आली. वयाची 38 वर्षे होऊनही मिताली आजही अविवाहित आहे. तिच्या खासगी आयुष्याबाबत अनेकदा काही प्रश्न उपस्थित करण्यात आले.
अशा प्रश्नांची मितालीनं एका मुलाखतीत उत्तरं दिली होती. ‘बऱ्याच काळापूर्वी जेव्हा मी लहान होते त्यावेळी माझ्या मनात (हा) विचार आला होता. पण, आता मात्र मी विवाहितांना पाहते तेव्हा असा कोणताही विचार माझ्या मनात येत नाही. मी सिंगलच फार चांगली आहे, आनंदी आहे’ असं मिताली म्हणाली होती.