गोल्ड कोस्ट : राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यात पहिल्या सुवर्णपदकाची कमाई केलीये. भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने ४८ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलेय. तिने १९६ किलो वजनी (८६ किलो स्नॅच आणि ११ किलो क्लीन अँड जर्क) उचलत हे जेतपद जिंकले.
भारताने पहिल्या दिवशी आतापर्यंत दोन पदके मिळवलीत. सुवर्णपदक जिंकणाऱ्या मीराबाई चानूवर कौतुकाचा वर्षाव केला जातोय.
ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला पहिलेवहिले पदक जिंकूम दिले. वेटलिफ्टिंगमध्ये गुरुराजाने रौप्यपदक मिळवले. त्याने ५६ किलो वजनी गटात हे पदक मिळवले.
भारतीय महिला हॉकी संघाला राष्ट्रकुल स्पर्धेतील सलामीच्याच सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. गोल्ड कोस्ट सेंटरमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात वेल्सने भारताला ३-२ असे पराभूत केले. हॉकी इतिहासातील वेल्सने भारतावर मिळवलेला हा पहिला विजय आहे. भारतीय संघाला या सामन्यात १५ पेनल्टी कॉर्नर मिळाले. मात्र त्यापैकी केवळ एका पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करण्यात भारताला यश आले.
राष्ट्रकुल स्पर्धेतील पहिल्या दिवशी बॅडमिंटन आणि टेबल टेनिसमध्ये भारताला खुशखबर मिळाली. टेबल टेनिसमध्ये मनिका बत्राने तर बॅडमिंटनध्ये सायना नेहवाल यांनी आपापल्या सामन्यात विजय मिळवला. बॅडमिंटमध्ये सायना नेहवालने श्रीलंकेच्या दिलरुक्षी बेरुवेलगेला २१-८, २१-४ असे हरवले. भारतीय महिला टेबल टेनिस संघाने आपल्या पहिल्या सामन्यात गुरुवारी श्रीलंकेला ३-० अशी मात दिली.